Tribal Culture And Swayamvar: आपल्यापैकी बऱ्याच लोकांना स्वयंवराची प्रथा माहीत असेल. स्वयंवराची प्रथा ही भारतीय संस्कृतीमधील एक जुनी प्रथा आहे. या प्रथेनुसार, एक तरूणी अनेक तरूणांमधून आपल्यासाठी पतीची निवड करते. स्वयंवर प्रथा ही वैदिक काळापासून चालत आली आहे. रामायण आणि महाभारतातही याचा उल्लेख आहे.
हीच परंपरा बिहारमध्ये आजही सुरू आहे. बिहारच्या मलिनिया गावात दोन दिवसांसाठी एक जत्रा भरते. ज्यात लग्नाचं वय झालेल्या तरूणी आणि तरूण सहभागी होतात. यावेळी तरूणांना जी मुलगी आवडते तो तिला पान खाऊ घालतो. जर तरूणीने ते पान खाल्लं तर समजलं जातं की, दोघांचा विवाह झाला आहे.
कशी असते ही परंपरा?
बिहारच्या मलिनिया गावात दूरून दूरून आदिवासी लोक येतात. इथे लोक पूजा करतात. यादरम्यान नाच-गाणंही होतं. आदिवासी लोकांसाठी हा उत्सव होळीसारखा असतो. यावेळी ते गुलाल खेळतात. ज्या स्वयंवराच्या प्रथेबाबत बोललं जात आहे त्यात तरूण तरूणीने पसंत केल्यावर काही दिवस त्याच्यासोबत राहते. त्यानंतर समाजाव्दारे त्यांचं लग्न लावलं जातं. जर सोबत राहिल्यानंतरही तरूण किंवा तरूणीने लग्नास नकार दिला तर त्यांना शिक्षा मिळते.
अनेकदा तरूणींना तरूण पसंत येत नाहीत, तेव्हा तरूणी त्याच्या हातून पान खाण्यास नकार देतात. अशात तरूण दुसऱ्या तरूणीचा शोध घेतात. बिहारमध्ये आयोजित या जत्रेमध्ये नेपाळ, बंगाल आणि झारखंडमधूनही लोक येतात. स्वयंवराची ही प्रथा जेव्हा एक तरूणी विवाहासाठी तयार होते तेव्हा आयोजित केली जाते. तरूणींना त्यांचा वर निवडण्याचं स्वातंत्र्य असतं.