ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - हवाई मार्गाने मुंबई दर्शन करण्यासाठी आयआरसीटीसीने नवीन उपक्रम राबवला आहे. या उपक्रमामध्ये प्रवाशांना हेलिकॉप्टरमधून मुंबईचे दर्शन घेता येईल. याकरता दक्षिण मुंबई व उत्तर मुंबई असे दोन वेगळे पर्याय पर्यटकांसमोर ठेवले आहेत. मंगळवार व शुक्रवार या दिवशी पर्यटकांना दक्षिण मुंबईतील जुहू, बांद्रा - वरळी सी-लिंक आणि हाजी अली असा प्रवास घडल्यावर पुन्हा परतीचा प्रवास हवाई मार्गेच होणार आहे. तर उत्तर मुंबईचा पर्याय निवडणा-या पर्यटकांना वर्सोवा, मालाड, गोराई, पॅगोडा व एस्सेल वर्ल्ड इत्यादी ठिकाणीचे हवाई दर्शन घडणार आहे. या प्रवासासाठी पर्यटकांना जुहू येथील एरोड्रोम येथून हॅलिकॉप्टर उपलब्ध होणार असून प्रत्येकी ५ हजार ५८० रुपये भाडे आकारण्यात येणार असल्याचे आयआरसीटीसीचे प्रादेशिक संचालक विरेंदर सिंग यांनी सांगितले आहे. तर ही सफर एक हजार फूट उंचीवरून घडवण्यात येणार असून पर्यटकांचा योग्य प्रतिसाद लाभल्यास इतर दोन दिवसही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सिंग यांनी सांगितले.
या उपक्रमाबद्दल पारएअरच्या अध्यक्ष पार्वती अय्यर यांनी असे सांगितले की, आम्ही चार्टर्ड फ्लाइट करता १५ मिनिटांच्या फेरीसाठी २० हजार रुपये भाडे घेतो. या उपक्रमासाठी आम्ही किमान भाडे ३ हजार ९९९ इतके ठेवले आहे. हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी दिवसाला किमान ३० फे-या होणे आवश्यक असल्याचेही अय्यर यांनी सांगितले.