पुणे : खात्रीशीर पुत्रजन्माबाबत नेटवरून बाजार सुरू असल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून त्याची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली. ‘खात्रीशीर पुत्रजन्माचा नेटवरून राजरोस बाजार’ हे वृत्त ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात प्रकाशित केले होते. आयुर्वेदिक गोळ्यांचे सेवन केल्यास हमखास पुत्रप्राप्ती होते, अशा जाहिराती काही संकेतस्थळांवर आहेत. संकेतस्थळांवरील चायनीज कॅलेंडरच्या आधारेदेखील मुलगा होईल की मुलगी, याबाबत अंदाज वर्तवले जात आहेत. याकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. त्यावर शिंदे म्हणाले, गर्भलिंगनिदान कायद्याच्या अंमलबजावणीबाबत शासन गंभीर आहे. हमखास पुत्रजन्माबाबत कोणी दावे करीत असेल, तर प्रशासनामार्फत त्याची चौकशी केली जाईल. ‘बेटी बचाव आंदोलना’च्या केंद्रीय सदस्या अॅड. वर्षा देशपांडे यांनीही कायद्याची पायमल्ली होत असल्याचे सांगत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचे त्याकडे लक्ष वेधले आहे. सावंत यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. ‘लोकमत’ने सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
पुत्रप्राप्तीच्या जाहिरातींवर कायदेशीर कारवाई करणार
By admin | Published: March 09, 2015 1:46 AM