सलेम: आपली ड्रीम बाईक खरेदी करण्यासाठी तमिळनाडूतील एक तरुण शोरूममध्ये गेला होता. त्यानं २.६ लाख रुपयांची दुचाकी खरेदी केली. मात्र तरुणानं केलेल्या खरेदीमुळे शोरूममधल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. तरुणानं दुचाकी खरेदी करताना दिलेली रक्कम मोजण्यासाठी १० तास लागतील याचा विचारही शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी केला नव्हता. तरुणानं १ रुपयांची नाणी देऊन २.६ लाख रुपयांची दुचाकी खरेदी केली.
पै पै जोडून वस्तू खरेदी केली असं आपण म्हणतो. व्ही. बूपती नावाच्या तरुणानं असंच काहीसं केलं. आवडती दुचाकी करण्यासाठी त्यानं १-१ रुपया साठवला. त्यासाठी त्याला ३ वर्षे लागली. यानंतर बूपती बजाजच्या शोरूममध्ये दुचाकी खरेदीसाठी गेला. त्यानं १ रुपयांची नाणी (२.६ लाख रुपये) देऊन डॉमिनॉर खरेदी केली. ही बाईक ४०० सीसीची आहे.
बूपती आणि त्याचे मित्र शनिवारी एका मिनी व्हॅनमधून शोरूमला पोहोचले. त्यांनी त्यांच्यासोबत नाण्यांनी भरलेलं पोतं आणलं होतं. बीसीएमध्ये पदवी घेतलेला बूपती एका खासगी कंपनीत कॉम्युटर ऑपरेटर म्हणून काम करतो. तो एक यूट्यूबरदेखील आहे. गेल्या चार वर्षांत त्यानं अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
तीन वर्षांपूर्वीच बूपतीनं डॉमिनॉर खरेदी करण्याचं ठरवलं. त्यावेळी बाईकची किंमत २ लाख रुपये होती. मात्र त्यावेळी बूपतीकडे इतके पैसे नव्हते. त्यामुळे यूट्यूबवरून मिळणारं उत्पन्न आणि पगार एकत्र करून दुचाकी खरेदी करण्याचं त्यानं ठरवलं. काही दिवसांपूर्वीच त्यानं बाईकची किंमत विचारली. ती २.६ लाख रुपये होती.
बूपतीनं त्याच्या बचतीचं रुपांतर १ रुपयाच्या नाण्यात करण्यास सुरुवात केली. त्यानं मंदिरं, हॉटेल, चहाच्या टपऱ्यांवरून जाऊन नोटांच्या बदल्यात एक रुपयांची नाणी घेतली. १ रुपयांची नाणी स्वीकारणार नसल्याचं शोरुमचे व्यवस्थापक असलेल्या महाविक्रांत यांनी सांगितलं. मात्र बूपती यांनी त्यांची समजूत काढली. बूपती यांचे चार मित्र आणि शोरुममधले पाच कर्मचारी यांनी मिळून २.६ लाख रुपये मोजले. त्यासाठी त्यांना १० तास लागले.