'सस्ती चीजों का शौक हम भी नही रखते' हे वाक्य अनेकदा आपण ऐकतो. अनेकदा आपले शौक पूर्ण करण्यासाठी अनेकजण हवे तेवढे पैसे मोजण्यासाठी तयार असतात. बऱ्याचदा तर बक्कळ पैसे मोजून आगळे-वेगळे शौक पूर्ण करण्यात येतात. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. क्रिस डॅलजेल नावाच्या एका 33 वर्षीय व्यक्ती व्यवसायाने एक शेफ आहे. तसेच त्याचं लग्न झालेलं असून त्याला दोन मुलं देखील आहेत. या व्यक्तीला आपल्या अंगावर टॅटू काढून घेण्याचा शौक आहे.
क्रिसने वयाच्या 16व्या वर्षी आपल्या शरीरावर पहिला टॅटू काढला होता. आतापर्यंत या अवलियाने आपल्या संपूर्ण शरीरावर 600 पेक्षा जास्त टॅटू काढले आहेत. परंतु अद्यापही त्याची हौस फिटली नसून त्याला आणखी टॅटू काढण्याची इच्छा आहे. आतापर्यंत क्रिसने आपल्या टॅटूवर थोडे-थोडके नाही तर 28000 पाउंड म्हणजेच 27 लाख रूपये खर्च केले आहेत. ऐकून धक्का बसला ना? आता तुम्ही म्हणाल की क्रिसचा हा शौक नसून वेडेपणा आहे. परंतु क्रिसला यामुळे काहीही फरक पडत नाही. तो आपला हा आगळा-वेगळा शौक जोपासण्यामध्ये फार खूश आहे.
'मेल ऑनलाइन'ने दिलेल्या वृत्तानुसार, आपलं संपूर्ण शरीर टॅटूने भरून जांव अशी क्रिसची इच्छा आहे. त्याने तर त्याचे डोळ, पायाचे तळवे आणि गुप्तांगावरही टॅटू काढण्याची इच्छा बोलून दाखवली. इतकचं नाही तर त्याने आणखी एक टॅटू काढण्यासाठी अपॉइंटमेन्ट देखील घेतली आहे.
क्रिसने बोलताना सांगितले की, त्याने जेव्हा आपल्या पापण्यांवर टॅटू काढला होता तेव्हा त्याला फार वेदना झाल्या होत्या. इतकंच नाही तर तीन दिवस त्याला डोळे उघडण्यासही त्रास होत होता. क्रिसने बोलताना संगितले की, मी या गोष्टीची चिंता कधीच केली नाही की, लोक त्याच्याबाबत काय विचार करतात? टॅटू काढताना ज्या वेदनांचा सामना करावा लागतो, त्याने मला एक आनंद मिळतो. शरीराच्या प्रत्येक अवयवावर टॅटू काढताना होणाऱ्या वेदना या वेगवेगळ्या असतात.' त्याने पुढे बोलताना सांगितले की, 'लोक त्याला रस्त्यामध्ये भेटतात तेव्हा प्रत्येकाच्या रिअॅक्शन या वेगळ्या असतात. अनेक लोक तर मला पाहून घाबरून जातात.'
क्रिसला फक्त चेहऱ्यावर टॅटू काढून घेण्यासाठी 48 तास लागले. दोन्ही हातांवर टॅटू काढण्यासाठी त्यांना 120 तास आणि त्याच्या डाव्या पायावर टॅटू काढण्यासाठी त्याला 160 तासांचा वेळ लागला. क्रिस म्हणतो की, टॅटू काढणं हे त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. माझ्या टॅटूंमुळेच मी इतर लोकांपेक्षा वेगळा ठरतो.