Tea Stall at Mountain: चहाची तल्लफ आली की मित्रमंडळी चहाच्या टपरीवर 'कटिंग' प्यायला जातात. ऑफिसच्या बाहेर सामान्यत: हे चित्र पाहायला मिळतं. पण जर एखाद्याला चहा पिण्यासाठी दोरखंडाच्या सहाय्याने डोंगरावर चढून जावं लागलं तर.... सध्या एक दुकान त्याच्या अनोख्या लोकेशनमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तुम्ही विचार करत असाल की या टपरीमध्ये विशेष काय आहे? ही टपरी एका खडकाच्या काठावर 393 फूट उंचीवर आहे. चहा पिण्यासाठी इथे लोक दोरीवर चढून इथे जातात आणि मग या साहसाचा आनंद घेतात. चीनच्या हुनान प्रांतातील झिन्युझाई नॅशनल जिओलॉजिकल पार्कमध्ये डोंगराच्या बाजूला ही टपरी आहे.
गिर्यारोहकांसाठी मिळते सुविधा
इनसाइडर डॉट कॉमच्या वृत्तानुसार, ज्या गिर्यारोहकांना गिर्यारोहणाच्या दरम्यान विश्रांतीची आवश्यकता असते त्यांना या टपरीवर अल्पोपहार विकला जातो. ट्विटरवर @gunsnrosesgirl3 या हँडलसह या स्टोअरचे छायाचित्र देखील अलीकडेच शेअर करण्यात आले आहे. फोटो शेअर झाल्यापासून त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एक लहान लाकडी पेटी लटकलेली असल्याचे फोटोत दिसते. एका कड्याच्या टोकाला लटकलेल्या या छोट्याशा दुकानाचा फोटो पाहा-
पोस्ट पाहून लोक थक्क झाले...
ही पोस्ट काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून या पोस्टची चर्चा आहे. या शेअरला १.२ मिलियन व्ह्यूज मिळाले असून ८ हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. या स्टोअरवर आपल्या प्रतिक्रिया शेअर करण्यासाठी अनेकांनी पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडले आहे. काहींनी लिहिले आहे की, हा निव्वळ वेडेपणा आहे. तर काहींचे असेही म्हणणे आहे की, यामागील कल्पना अविश्वसनीय व आश्चर्यकारक आहे.