ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १ - तामिळनाडूमधील शिक्षक व विद्यार्थ्यांमधील प्रेमसंबंधांमुळे शाळा प्रशासनाची डोकेदुखी वाढत असतानाच आता या प्रेमसंबंधांवर लगाम लावण्यासाठी शिक्षकांनी शाळेत वकिलांसारखा मोठा काळा कोट घालणे बंधनकारक करावे अशी सूचना तामिळनाडूतील शिक्षक संघटनांनी राज्य सरकारला केली आहे.
तामिळनाडूमध्ये गेल्या महिनाभरात महिला शिक्षिका विद्यार्थ्यासोबत पळ गेल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यातील पहिल्या घटनेत २६ वर्षाची शिक्षिक १६ वर्षाच्या मुलासोबत तर दुस-या २३ वर्षाची शिक्षिका १९ वर्षाच्या मुलासोबत पळून गेली होती. या घटनेनंतर हादरलेल्या राज्य सरकारने अनौपचारिक पातळीवर एक समिती बनवली व या समितीतील शिक्षक संघटनांकडून सुचना मागवल्या. या समितीला शिक्षक संघटनांनी भन्नाट सूचना केल्या आहेत. वकिलांप्रमाणेच महिला शिक्षकांनाही एक मोठा काळा कोट घालणे बंधनकारक करावे असे म्हटले आहे. पाश्चिमात्त्य संस्कृतीचे अनुकरण, अंगप्रदर्शन यामुळे अशा घटना घडततात असे अजब तर्कट या संघटनांनी मांडले आहे. विद्यार्थी शाळेत शिकण्यासाठी येतात, पण दुर्दैवाने शिक्षक शिकवण्यापेक्षा जास्त लक्ष स्वतःच्या फॅशनकडे देतात. या सर्व नादात मुल महिला शिक्षिकांकडे आकर्षित होतात असे या संघटनेने समितीला सांगितल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्रात म्हटले आहे. शिक्षकांनी जीन्स, टाइट टी शर्ट व छोटे कपडे घातले तर विद्यार्थी त्यांच्याकडे आकर्षित होतील असे एका पदाधिका-याने नमूद केले. शिक्षक व विद्यार्थ्यांवरील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शाळेच्या कानाकोप-यात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत असे या संघटनांनी राज्य सरकारला सांगितले.