आपल्या हृदयाच्या घड्याळाची टिकटिक कधी तुम्ही ऐकलीय? जोपर्यंत ही टिकटिक सुरू असते, तोवर आपलं आयुष्यही सुरू असतं, एकदा ही टिकटिक थांबली की मग संपलं सगळंच! म्हणूनच आपल्याला जीवन देणारं आयुष्याचं हे घड्याळ सदैव चालू राहावं, त्याची टिकटिक कायम चालू राहावी, यासाठी साऱ्यांची धडपड. कारण त्यावरच आपलं अस्तित्व, पण खरोखरची काही घड्याळंही अशी आहेत, ज्यांच्यावर त्या-त्या शहराचं, काही वेळा त्या देशाचंही अस्तित्व अवलंबून असतं. कारण शेकडो वर्षांपूर्वीची ही घड्याळं त्या शहराचं केवळ हृदयच नव्हे, तर त्या शहराचा सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक ठेवा असतो. त्या घड्याळामुळेच त्या शहराचं अस्तित्व असतं. पूर्वी त्या शहराचं सांस्कृतिक, ऐतिहासिक प्रतीक म्हणून अशी अनेक मोठमोठी, जुनी घड्याळं उंच मनोऱ्यांवर लावलेली असत. येणाऱ्या-जाणाऱ्यांचं ध्यान तर आपसूक या घड्याळांकडे जायचंच, पण पर्यटकांसाठीही ते एक मोठं आकर्षण असायचं. त्या-त्या शहराचं वैभव सांगणारी अशी घड्याळं, घंटा आता कमी झाल्या असल्या, तरी काही ठिकाणी त्यांची धडधड अजूनही ऐकायला मिळते. आपल्याकडेही पूर्वी अशी अनेक ब्रिटिशकालीन घड्याळं त्यांच्या टिकटिकीमुळे शहराचं जिवंतपण टिकवून ठेवायची. आयुष्य सुरू आहे आणि ते कायम पुढेपुढेच जात राहणार आहे, असं सांगणारं ते प्रतीकच!
जपानमध्येही असंच एक भलंमोठं, शंभर वर्षं जुनं ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक ठेवा असणारं घड्याळ होतं. जपानच्या मियागी प्रांतातील यामामोटो येथील फुमोंजी या बौद्ध मंदिरात हे घड्याळ जतन करुन ठेवण्यात आलं होतं. मार्च, २०११ मध्ये तिथे आलेल्या एका मोठ्या भूकंपात आणि त्यानंतरच्या त्सुनामीत हे बौद्ध मंदिरच नष्ट झालं नाही, तर दगड-मातीच्या त्या ढिगाऱ्यात घड्याळही मोडून पडलं. त्सुनामीनंतर या मंदिराचे खांब आणि त्याचं छत तेवढं शिल्लक होतं, बाकी सगळं उद्ध्वस्त झालं होतं. या भूकंप आणि त्सुनामीत १८ हजारांपेक्षाही अधिक लोक ठार झाले होते. अतिशय विषण्ण करणारी अशी ही घटना होती. फुमोंजी या बौद्ध मंदिरात त्सुनामीच्या लाटा घुसल्यानंतर त्याचा ढाचा तेवढा शिल्लक होता, पण मंदिराचे प्रमुख पुजारी आणि घड्याळाचे मालक बंसुन सकानो यांनी हा ऐतिहासिक, सांस्कृतिक ठेवा पुन्हा शोधून काढायचा ठरवलं. दगड-मातीचा तो सगळा मलबा त्यांनी उपसून काढला आणि मोडून पडलेलं ते जुनं घड्याळही शोधून काढलं. ते पुन्हा सुरू व्हावं, त्याची धडधड, टिकटिक पुन्हा ऐकायला यावी, यासाठी त्यांनी जंगजंग पछाडलं, पण ते घड्याळ काही सुरू झालं नाही. त्याची धडधड थांबली ती थांबलीच. त्यानंतर, त्या शहराचं हृदयच जणू लुप्त झाल्यासारखं झालं...
जपान हे भूकंपांचं शहर. भूकंपांचे हादरे बसणं या देशाला नवीन नाही. या वर्षी १३ फेब्रुवारी, २०२१ला, म्हणजे बरोबर दहा वर्षांनी त्याच परिसरात, पुन्हा एकदा भूकंपाचा तसाच शक्तिशाली हादरा बसला आणि चमत्कार झाला! शहराचं प्रतीक असलेला शंभर वर्षांपूर्वीचा हा ‘पुराणपुरुष’; हे घड्याळ दहा वर्षांपूर्वी बंद पडलं होतं आणि जे दुरुस्त करायचे ‘घड्याळाच्या निष्णात डॉक्टरांचे’ सारे प्रयत्न विफल ठरले होते, ते घड्याळ भूकंपाच्या तशाच धक्क्यांनी पुन्हा सुरू झालं होतं. त्याची धडधड, त्याची टिकटिक पुन्हा ऐकायला यायला लागली होती! भूकंपानंतरच्या दुसऱ्या दिवशी सकाळी बंसुन सकानो यांना जाग आली आणि त्यांनी आपली नित्यकर्म सुरू केली, तेव्हा त्यांना या घड्याळाची टिकटिक पुन्हा ऐकू लागली आणि त्यांचे पाय जागच्या जागी थांबले. त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला!
‘सिको’ या कंपनीचं हे घड्याळ. दहा वर्षांपूर्वी कंपनीच्या निष्णात कर्मचाऱ्यांनाही हे घड्याळ पुन्हा सुरू करता आलं नव्हतं. कंपनीचे मालक आणि प्रतिनिधी यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं, दहा वर्षांपूर्वी भूकंपाच्या ज्या धक्क्यांनी हे घड्याळ बंद पडलं होतं, तशाच शक्तिशाली भूकंपामुळे हे घड्याळ पुन्हा सुरू झालं असावं. दुसरी शक्यता म्हणजे, ज्या भूकंप आणि त्सुनामीमुळे या घड्याळात धूळ आणि माती गेली होती, ती तशाच दुसऱ्या मोठ्या भूकंपाच्या हादऱ्यामुळे सैल होऊन घड्याळ पुन्हा सुरू झालं असावं!
‘भविष्यकाळासाठी हे सुचिन्ह!’ शंभर वर्षांपूर्वीचं हे घड्याळ पुन्हा सुरू झाल्यामुळे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना बंसुन सकानो म्हणाले, या घटनेमुळे मला पुन्हा प्रेरणा मिळाली आहे. नवीन दृढनिश्चयानं पुढे जाण्यासाठी ते आम्हा सर्वांना प्रेरित करीत असावं. कोरोनासारख्या घटनांनी आपलं आयुष्य संपल्यासारखं, थांबल्यासारखं वाटत असलं, तरी तसं ते थांबलेलं नाही, उलट पु्न्हा सगळं काही सुरळीत होईल, या महामारीतून आपण निभावून जाऊ आणि आपल्या सर्वांचा भविष्यकाळ चांगला असेल, हे सुचवित असल्याचं ते सुचिन्ह आहे! निसर्गाचा मी आभारी आहे!...