पटणा - एखाद्या युवक युवतीचं एकमेकांवर प्रेम असलं तरी अनेकदा घरच्यांकडून त्याला विरोध होता. काही ठिकाणी ऑनर किलिंगचे प्रकारही सर्रास घडतात. घरच्यांच्या मनाविरुद्ध मुलीने प्रियकराशी लग्न केले तर तिला संपवण्यात येते. मात्र मोतिहारी जिल्ह्यात वेगळाच प्रकार घडला आहे. प्रियकरासोबत दसऱ्याच्या जत्रेत गेलेल्या तरुणीला तिच्या भावाने पाहिले आणि पुढे जे घडले त्याने जोडप्याला आनंदच झाला.
जत्रेत प्रियकरासोबत तरुणी पाहायला मिळाली तेव्हा भावाने या दोघांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्याठिकाणी पोलिसांनी दोघांच्या कुटुंबाना बोलवून लग्नासाठी तयार केले. नवरात्रीनिमित्त जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. तिथे प्रेयसी प्रियकरासोबत फिरत होती. दोघंही आनंद घेत होते. त्याचवेळी जत्रेत भावाने बहिणीला प्रियकरासोबत पाहिले आणि त्याने थेट याला विरोध करत दोघांना पोलीस स्टेशनला नेले.
पोलीस ठाण्यात प्रेमी युगलांनी त्यांचे प्रेम कहानी अधिकाऱ्यांना सांगितली. आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतो. परंतु घरच्यांचा आमच्या प्रेमाला विरोध आहे. त्यानंतर पोलिसांनी पुढाकार घेत दोघांच्या कुटुंबाना पोलीस ठाण्यात बोलावले. पोलिसांच्या मध्यस्थीने दोन्ही कुटुंब लग्नासाठी तयार झाले. त्यानंतर मंदिरात जात प्रियकराचं आणि प्रेयसीचं लग्न झाले. युवती तिच्या पतीसोबत सासरी गेली. या प्रियकराचं नाव राहुल आणि प्रेयसीचं नाव कल्पना आहे.
युवकाच्या भावाचा विरोधराहुलच्या बहिणीचं लग्न कल्पनाच्या गावात झाले होते. राहुल नेहमी बहिणीकडे येऊन जात असे. कल्पनाचं घर राहुलच्या बहिणीच्या सासरजवळ आहे. याचठिकाणी दोघांची ओळख झाली. त्यानंतर ओळखीचं रुपांतर प्रेमात झाले. दोघंही एकमेकांना लपून भेटू लागले. परंतु या दोघांचे प्रेम जगासमोर आले. दोघांच्या अफेअरबद्दल मुलीच्या नातेवाईकांना कळाले. तेव्हा दोघांच्या लग्नाचा विचार होऊ लागला. परंतु राहुलचा मोठा भाऊ या नात्याने खुश नव्हता त्याने नाराजी व्यक्त करत विरोध केला. त्यामुळे दोघांचे लग्न झाले नाही.