दोन देशांदरम्यान प्रवास करत असताना हवेतच जर एखाद्याचा जन्म झाला तर त्याला कोणत्या देशाचे नागरिकत्व मिळेल? जिथून ती महिला निघाली त्या देशाचे की ज्या देशाला ती जाणार आहे त्या देशाचे? अमेरिकेहून डॉमनिका रिपब्लिकला जाणाऱ्या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे.
झाले असे की, अमेरिकेतील २१ वर्षीय महिला केंड्रिया रोडेन ही ३२ आठवड्यांची गर्भवती होती. तिच्या डिलिव्हरी डेटला अद्याप एक महिना शिल्लक असल्याने डॉक्टरांनीही तिला विमान प्रवासाला परवानगी दिली. विमानाने अमेरिकेहून डॉमनिका रिपब्लिकला जाण्यासाठी उड्डाण केल्याच्या ३० मिनिटांनी तिला प्रसवकळा सुरु झाल्या. विमानातील क्रू मेंबर्स आणि प्रवाशांनी महिलेची विमानातच 36,000 फुटांच्या उंचीवर प्रसुती केली. महिलेने विमानातच मुलाला जन्म दिला.
केंड्रियाने डॉमनिक रिपब्लिकला पोहोचल्यावर अमेरिकी दुतावासामध्ये मुलाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला. मुलाच्या नागरिकत्वावरून वाद होईल असे तिला मनातून वाटत होते. परंतू, अमेरिकेने स्पष्टपणे तिचे मुल अमेरिकनच असल्याचे म्हटले. त्याची आई ही कनेक्टिकटच्या हार्टफोर्डची राहणारी आहे, यामुळे विमानात जन्म झाला तरी तिचे मूल हे अमेरिकनच असेल, असे सांगितले.
केंड्रियाची बहीण केंडली रॉडेन हिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. केंडली म्हणाली- तिने मला सांगितले की प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत. आणि मला धक्काच बसला. माझ्या बहिणीला मदत करण्यासाठी चार प्रवासी पुढे आले. बहिणीला विमानाच्या मागच्या बाजूला नेण्यात आले. 20 मिनिटांनंतर विमानात मुलाच्या जन्माची घोषणा करण्यात आली. जन्मानंतर मुलाला 4 दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.