Viral Video: स्कूटीवरुन जात असताना एका महिलेच्या डोक्यावर नारळ पडल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही घटना मलेशियातील जालान तेलुक कुंबर या छोट्या शहरात घडली. पाठीमागून येणाऱ्या गाडीच्या डॅशकॅममध्ये ही घटना कैद झाली.
रविवारी कॅमेऱ्यात कैद झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या महिलेने हेल्मेट घातले होते, त्यामुळे तिचा जीव वाचला. हा 28 सेकंदांचा व्हिडिओ Reddit वर पोस्ट करण्यात आला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही स्कूटरस्वार महिला तेलुक कुंबरहून जॉर्ज टाऊनला जात होती. व्हिडिओमध्ये स्कूटीच्या मागील सीटवर बसलेल्या महिलेच्या डोक्यावर बास्केटबॉलच्या आकाराचा नारळ पडताना दिसत आहे.
अचानक डोक्यात नारळ पडल्यानंतर महिला गाडीवरुन खाली पडते, तिचे हेल्मेटही दुसऱ्या बाजूला जाऊ पडते. यानंतर दुचाकीच्या मागून येणारी कार अचानक थांबते. स्कूटी चालवणाऱ्या महिलेने लगेच आपले वाहन थांबवले आणि जखमी महिलेला मदत केली. यावेळी रस्त्यावरून प्रवास करणारे अनेक स्थानिक घटनास्थळी थांबतात आणि इतर वाहनचालकांना त्यांच्या वाहनाचा वेग कमी करण्यास सांगतात. या घटनेनंतर महिलेला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. स्थानिक मीडियानुसार, महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.