एका चिनी कॉर्पोरेशनने कर्मचाऱ्यांना वर्षाच्या अखेरीस प्रोत्साहन म्हणून एवढी रक्कम दिली की जिचा कुणी विचारही केला नसेल. या कंपनीच्या मालकाने स्टेजवरून कर्मचाऱ्यांना तब्बल ६१ दशलक्ष युआन (सुमारे ७० कोटी रूपये) ४० कर्मचाऱ्यांमध्ये वाटले. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार १७ जानेवारी रोजी हेनान प्रांतामधील एका क्रेन निर्मात्याने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होता आहे. त्यात स्टेजवर सुमारे दोन मीटर उंच नोटांचा ढीग ठेवलेला दिसत आहे.
कंपनीच्या पब्लिक रिलेशन विभागातील एका मॅनेजरचा संदर्भ देत एका वृत्तसंस्थेने सांगितले की, हेनान माइन फर्मच्या तीन सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या सेल्स मॅनेजर्सना पाच मिलीयन युआन म्हणजेच सुमारे ६ कोटी रुपये मिळाले. तर ३० हून अधिक इतर कर्मचाऱ्यांना किमान एक दशलक्ष युआन म्हणजेच सुमारे १ कोटी २० लाखांहून अधिक रक्कम मिळाली. सूत्रांनी सांगितले की, आम्ही १७ जानेवारी रोजी संध्याकाळी वर्षाच्या अखेरीस एक सेल्स मिटिंग घेतली. त्यामध्ये ४० सेल्स मॅनेजर्सना एकूण ६१ दशलक्ष युआन एवढी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.
तसेच एका स्पर्धेचेही आयोजन कऱण्यात आले. त्यामध्ये एका ठराविक वेळात कर्मचारी किती युआनच्या नोटा मोजू शकतात, याची कसोटी लावण्यात आली. कंपनीने या स्पर्धेवर १२ दशलक्ष युआन खर्च केले. सर्वात वेगाने नोटा मोजणाऱ्याला १५७००० युआन म्हणजेच सुमारे १९ लाख रुपये देण्यात आले. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार पैशांचं एक बंडल हे १०,००० युआनचे होते. काळा सुट आणि लाल स्कार्फमधील कर्मचारी स्टेजवर हातात नोटांची बंडले घेतलेल्या स्थितीत दिसत आहेत.
अधिकृत संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार हेनान माईन नावाची कंपनी ५ हजार १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देते. तसेच २०२२ मध्ये ९.१६ दशलक्ष युआन एवढा सेल्स रेव्हेन्यू त्य़ांनी मिळवला होता. तो मागच्या वर्षीपेक्षा २३ टक्क्यांनी अधिक होता.