कोविड काळानंतर हळूहळू जनजीवन पुर्वपदावर येत आहे. कंपन्या सुरू झाल्या आहेत. आर्थिक स्थिरता येऊ लागली आहे. यातच एका कंपनीच्या मालकाने जे कृत्य केले त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात व्हायरल होत आहे. कंपनीच्या मालकाने कर्मचाऱ्यांसाठी जे केले ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. या कंपनीच्या बॉसनं सर्व कर्मचाऱ्यांना जवळपास प्रत्येकी ६२ हजार रुपये दिले आहेत. ज्यामुळे वाढत्या वीज बिलाचा फटका कर्मचाऱ्यांना बसू नये.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीला फायदा होत असल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांना बक्षिस देण्याचा निर्णय घेतला. ब्रिटनच्या एमरीज टिम्बर अँन्ड बिल्डर्स मर्चेंट्सच्या ५१ वर्षीय एमडी जेम्स हिपकिंस यांनी कर्मचाऱ्यांना जबरदस्त भेट दिली आहे. त्यांनी कंपनीच्या ६० कर्मचाऱ्यांना ३७ लाख रुपये वाटले आहेत. जेम्स म्हणाले की, सध्या सर्व लोकं संकटात आहेत. अशावेळी त्यांची मदत करणे आणि कंपनीला झालेला नफा वाटून घेण्याची इच्छा होती. मागील आठवड्यात ब्रिटनच्या वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाली आहे. घरगुती बिलात ३.५ टक्के वाढ झाल्याने इतर गोष्टींवरही परिणाम झाला आहे.
सर्व कर्मचारी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशावेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांबरोबर आनंद शेअर करायचा होता. मालकाने कर्मचाऱ्यांना दिलेल्या अचानक बोनसनं त्यांना सुखद धक्का बसला. कर्मचारी कंपनीच्या मालकावर प्रचंड खुश झाले. कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेली आर्थिक भेट त्यांच्यासाठी मोठी मदत असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली. या पैशामुळे वाढत्या महागाईत कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचं काम केले आहे. सध्या ब्रिटनमध्ये महागाई वाढली आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करणं कंपनीने त्यांचे कर्तव्य समजलं असल्याचं मालक जेम्स यांनी सांगितले.
एमरीज टिम्बर अँन्ड बिल्डर्स मर्चेट्सच्या मालकाने सांगितले की, आमच्या कंपनीचे दरवाजे कर्मचाऱ्यांसाठी नेहमी खुले आहेत. जर कंपनीला फायदा होत असेल आणि त्याचं बक्षिस कर्मचाऱ्यांना न देणे हे चुकीचे आहे. आमची कंपनी सध्या फायद्यात आहे. हा फायदा ज्या कर्मचाऱ्यांमुळे झाला त्यांना त्यांचा वाटा मिळायला हवा. चांगला मालक तोच असतो जो चांगला फायदा कमवतो. परंतु कंपनीमध्ये चांगलं वातावरण राहणे सर्वांना मदत करण्याची जबाबदारीही त्याच मालकाची असते असं त्यांनी म्हटलं आहे.