माणसाची उंची किती वाढू शकते? माणूस काय वेगानं वाढतो? माणसांचं जाऊ द्या... झाडांची जास्तीत जास्त उंची किती असू शकते? त्यांची उंची किती काळ वाढू शकते? माणसं आणि झाडांचंही जाऊ द्या, एखाद्या शिखराची उंची किती वाढू शकते? - असं विचारल्यावर तुम्ही नक्कीच विचारणाऱ्याला वेड्यात काढाल. पण असं होतंय खरं. तेही कोणत्या शिखराचं? - तर भूलोकीचा स्वर्ग मानल्या जाणाऱ्या आणि जगातल्या सर्वोच्च शिखराची म्हणजेच एव्हरेस्टची उंची दरवर्षी वाढते आहे. शेकडो वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे आणि सध्या दरवर्षी दोन मिलिमीटरनं ही उंची वाढते आहे.
यामुळे हिमालयातील भौगोलिक परिस्थितीत तर फरक पडतो आहेच; पण एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांनाही नव्या आव्हानांना सामोरं जात अधिक उंची गाठावी लागते आहे. पुढील काही वर्षांत एव्हरेस्टची उंची आणखी वाढल्यामुळे गिर्यारोहकांपुढचं आव्हान आणखी खडतर होत जाईल. आतापर्यंत एव्हरेस्टची उंची किती वाढली असावी? त्याच्या सर्वसाधारण उंचीपेक्षा एव्हरेस्ट शिखर सध्या तब्बल १५ ते वीस मीटरनं उंच झालं आहे.
अर्थातच त्यासाठी खूप मोठा काळ लागला असला, तरी वीस मीटर उंची वाढणं ही छोटी गोष्ट नाही. नुकत्याच झालेल्या एका नव्या अभ्यासानुसार हा दावा करण्यात आला आहे. अभ्यासाचे सह-लेखक व युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल)चे पीएच. डी.चे विद्यार्थी ॲडम स्मिथ आणि भूगर्भशास्त्रज्ञ मॅथ्यू फॉक्स यांचं म्हणणं आहे की, ‘हिमालयाच्या सर्वांत उंच भागापासून सुमारे ७५ किलोमीटर दूर असलेल्या अरुण नदीमुळे एव्हरेस्टच्या उंचीत बदल होत आहेे.
या नदीच्या अंतर्गत भागात होत असलेल्या बदलांमुळे हा बदल दिसून येत आहेत. साधारण ८९ हजार वर्षांपूर्वी अरुण नदीचा काही भाग हिमालयातील कोसी नदीत विलीन झाला. त्यामुळे नदीचे पात्र आणि मार्ग तर बदललाच; पण त्यामुळे नदीची आणि आजूबाजूच्या परिसराची धूपही वाढली. तिथले खडक आणि माती मोठ्या प्रमाणात वाहून गेले. त्यामुळे तिथल्या पृष्ठभागाचं वजनही कमी झालं. या कारणांमुळे एव्हरेस्टची उंची वाढते आहे.’
एका साध्या उदाहरणानं हा आश्चर्यजनक बदल समजून घेता येईल. समजा सामानानं खचाखच भरलेलं एखादं भलं मोठं जहाज आहे. समजा या जहाजातला सारा माल काढून घेतला, दुसरीकडे ठेवला तर जहाज हलकं होईल आणि आधी ते पाण्यात जितकं बुडालं होतं, त्यापेक्षा वर येईल. एव्हरेस्टच्या बाबतीत सध्या जे होतं आहे, ते साधारण अशाच प्रकारचं आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे. साधारण चार ते पाच कोटी वर्षांपूर्वी भूगर्भातील हालचालींमुळे हिमालयाची निर्मिती झाली असावी. त्यात अजूनही बदल सुरूच आहेत. यापुढेही कित्येक काळ हे बदल होत राहतील. पण याचा अर्थ हिमालयाची उंची कायम वाढतच राहील, असं नाही. काही काळानंतर हिमालयाची उंची वाढणं थांबेल. किती असेल हा कालावधी? - या प्रक्रियेलाही काही हजार वर्षं लागू शकतील, असं संशोधकांचं म्हणणं आहे. हिमालयात वाहणाऱ्या नद्या समतोल स्थितीत येईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील.
‘नेचर जियोसायन्स’ या जगप्रसिद्ध विज्ञान मासिकात प्रसिद्ध झालेल्या शोधप्रबंधात म्हटलं आहे, जमिनीकडून वरच्या बाजूला ढकलल्या जाणाऱ्या या बलामुळे केवळ एव्हरेस्टचीच नव्हे, तर इतरही काही शिखरांची उंची वाढते आहे. हिमालयातील ल्होसे व मकालू ही जगातील चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची सर्वोच्च शिखरं. हे बल या शिखरांचीही उंची वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. अरुण नदीपासून जवळच असलेल्या मकालू शिखराच्या वाढीचा वेग आणखी झपाट्यानं वाढू शकेल, असं संशोधकांचं म्हणणं आहे. एव्हरेस्टची उंची आणखी किती वाढेल हे निश्चित नसलं तरी ही वाढती उंची गिर्यारोहकांच्या अडचणीत निरंतर वाढ करत राहणार हे मात्र नक्की. एव्हरेस्टची उंची सतत वाढत असल्याने आता एव्हरेस्टची उंची साधारण ८,८४९ मीटर (२९,०३२ फूट) इतकी आहे. इतक्या उंचीवर हवामान अतिशय विरळ असतं आणि ऑक्सिजनचं प्रमाणही अतिशय घटलेलं असतं. त्यामुळे इथली जगण्याची लढाई आणखीच कठीण होते.
जीपीएसने कळतेय एव्हरेस्टची वाढ!संशोधकांचं म्हणणं आहे, एव्हरेस्ट दरवर्षी नवी उंची गाठतं आहे, हे जीपीएसनं समजू शकतं. त्यात आणखी किती आणि कसे बदल होतील, याचाही अंदाज आपण लावू शकतो. यासंदर्भात काही संशोधकांचं म्हणणं आहे, एव्हरेस्टच्या वाढीबाबतचा हा सिद्धांत विश्वसनीय वाटत असला, तरी अजूनही अनेक गोष्टी अशा आहेत, त्याबाबत स्पष्टता आलेली नाही. त्यानंतरच खात्रीशीरपणे काही सांगता येऊ शकेल. काही संशोधक मात्र या अभ्यासाविषयी साशंक आहेत.