World's Longest Traffic Jam: कधी एखाद्या शहरातून दुसऱ्या शहरात जाताना किंवा ऑफिसला जाताना अनेकदा शहरांमध्ये ट्रॅफिक जॅममुळे लोक हैराण झालेले असतात. आजकाल शहरांमध्ये गाड्यांची इतकी संख्या वाढली आहे की, सकाळी आणि सायंकाळी ट्रॅफिक जॅममुळे जास्त हैराण व्हायला होतं. पण तुम्हाला जगातील सगळ्यात लांब ट्रॅफिक जॅमबाबत माहीत आहे का? कदाचित नसेलही. पण जगातील सगळ्यात लांब ट्रॅफिक जॅम 12 दिवसांसाठी झाला होता. हे चीनच्या एका शहरात घडलं होतं.
सामान्यपणे आपल्याकडे ट्रॅफिक जॅम झाला तर 2 किंवा 3 तासात त्यातून बाहेर पडता येतं. पण 14 ऑगस्ट 2010 मध्ये चीनच्या एका शहरात असा काही ट्रॅफिक जॅम झाला की, लोकांना 12 दिवस एका जागेवरून हलता आलं नाही. सगळी कामे त्यांना तिथेच करावी लागली. म्हणून या ट्रॅफिक जॅमला जगातील सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम म्हणताते.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ट्रॅफिक जॅममध्ये गाड्यांच्या रांगा साधारण 100 किलोमीटर परिसरात लागल्या होत्या. असं सांगितलं जातं की, त्यावेळी चीनच्या नॅशनल हायवे 110 वर हजारो गाड्या अडकून पडल्या होत्या. वरून पाहिलं तर खालच्या गाड्या मुंग्यांसारख्या दिसत होत्या.
ही घटना मंगोलिया ते बीजिंगपर्यंत कोळसा आणि निर्माण साहित्य घेऊन जात असलेल्या ट्रकांमुळे झाली होती. बीजिंग आणि तिबेटला जोडणाऱ्या रस्त्याचे त्यावेळी काम सुरू होते. त्यामुळे गाड्या पुढे जाऊ शकत नव्हत्या. इथे काही गाड्या बिघडल्याही होत्या त्यामुळे रस्ता ब्लॉक झाला होता.
हा जॅम इतका लांब होता की, यात अडकलेल्या गाड्या दिवसभर केवळ 1 किलोमीटर अंतरच पुढे सरकू शकत होत्या. जॅममुळे या रस्त्यावर गाड्या आणि लोकांची गर्दीच गद्री होती. लोक आपल्या गाड्यांवर बसून गेम्स खेळत होते.
रस्त्यावर उभ्या असलेल्या कार किंवा इतर गाड्या पायी जाणाऱ्यांसाठी शेल्टर बनल्या. लोक भूक आणि तहानेने व्याकूळ झाले होते. स्थानिक लोकांनी संधीचं सोनं करण्यासाठी तिथे काही दुकाने सुरू केली आणि जॅममध्ये अडकलेल्या लोकांना जेवण-पाणी विकू लागले. यातून त्यांची थोडी कमाईही झाली.