शिवपुरी - शिवपुरी जिल्ह्यात CM Helpline वरील तक्रारीचं अजब प्रकरण पाहायला मिळालं. सोन्हर गावात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलानं त्याच्या आईविरोधात CM हेल्पलाईनवर संपर्क साधत तक्रार दाखल केली. जेवण देणार नाही असं आईनं म्हटल्याचा आरोप करत त्याने तिला मला उपाशी ठेवायचं आहे असं सांगितले. मुलाद्वारे मिळालेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री कार्यालयानेही त्याची गंभीर दखल घेत थेट पोलीस मुलाच्या घरी धाडले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोन्हर गावात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलाने सीएम हेल्पलाईन नंबर १८१ वर कॉल केला. माझी आई मला जेवण देत नाही. माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी ती मला उपाशी ठेवू इच्छिते असं त्याने सांगितले. त्यानंतर मुलाच्या तक्रारीची दखल घेत जेव्हा पोलीस घरी पोहचले तेव्हा सुरुवातीला आईला काहीच कळाले नाही. पोलिसांना पाहून आई घाबरली. परंतु जेव्हा पोलिसांनी हा प्रकार आईच्या कानावर टाकला तेव्हा हा खुलासा झाला.
तर अमोलपठा पोलीस प्रभारी हरिश सोलंकी यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा महिलेने आम्हाला कारण विचारलं. तेव्हा तुम्ही मुलाला जेवण का देत नाही असा प्रश्न आम्ही केला. पोलिसांच्या प्रश्नावर आई घाबरली. महिलेने पोलिसांना सांगितले की, असे कधी झाले नाही. मी केवळ घरातील काम वाटून देत होती. कारण पतीच्या मृत्यूनंतर आता कुणीच आधार नाही. त्यासाठी मज्जा म्हणून असं बोलत असते. त्यात गोष्टीने नाराज होऊन मुलाने तक्रार केली असं महिलेने पोलिसांना म्हटलं.
पोलिसांनी मुलाच्या तक्रारीवरून महिलेचे घर गाठले. त्याठिकाणी घडलेला प्रकार सांगताच आईनं मुलाची मस्करी केल्याचं पुढे आले. तेव्हा पोलिसांनी मुलाला आणि आईला दोघांना समजावून या प्रकरणावर पडदा टाकला. हे गंभीर प्रकरण नव्हते. आईनं मुलाला मस्करीत असं बोलली असं पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पुढील कार्यवाही न करता हा वाद मिटवण्यात आला. परंतु या संपूर्ण प्रकारानं मुलासोबत केलेली मस्करी आईच्या अंगलट आल्याचं दिसून आले.