आगर मालवा - मध्य प्रदेशातील आगर मालवा शहरातील प्रसिद्ध मोतीसागर तलावात खोदकाम करताना लाखो रुपयांचं पैशाचं घबाड सापडल्यानं खळबळ माजली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या नोटा पोलीस विभागाकडे दिल्या आहेत. या नोटा नेमक्या इथं कशा आल्या याबाबत पोलीस आणि प्रशासन संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहे.
आगर मालवा येथील मोतीसागर तलावात उन्हाळ्यामुळे रुंदीकरणाचं काम सुरू आहे. अशावेळी जेसीबीनं या तलावात खोदकाम सुरू होतं. त्यावेळी अचानक जेसीबीच्या खोऱ्यात एक पोतं अडकलं. त्यात काही नोटा आढळल्या. या जेसीबी चालकानं महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने अधिकारी आणि कर्मचारी तिथे पोहचले. ज्यावेळी हे पोतं बाहेर काढले तेव्हा त्यात ५००-५०० रुपयांच्या नोटा आढळल्या. प्रथम तपासात या पोत्यात जवळपास ५ ते ७ लाख रुपये असतील असा अंदाज लावला जात आहे.
आगर महापालिकेकडून मोतीसागर तलावाच्या रुंदीकरणासह सौंदर्यीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यावेळी तलावाच्या किनारी असलेल्या झुडुपांची छाटणी करून तिथे खोदकाम करण्यात येत आहे. जेसीबीनं इथं काम करताना हे पोत आढळून आलं. त्यानंतर सूचना मिळताच महापालिकेचे अधिकारी निलेश जैन घटनास्थळी पोहचले. त्यांनी पोलिसांनाही माहिती दिली. त्यानंतर हे पोतं उघडून पाहताच त्यात मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्या.
लहान मुलांनी दिली माहिती
मागील काही दिवसांपासून आगर नगरपालिकेकडून सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे. बुधवारी खोदकाम करताना तलावाच्या किनारी काही मुलं त्यांच्या बकऱ्यांना चराई करण्यासाठी आणलं होतं. त्यावेळी मुलांची नजर या पोत्यावर गेली. ती माहिती जेसीबी चालकाला दिली. तेव्हा जेसीबीनं ते पोतं बाहेर काढलं असता त्यात ५०० रुपयांच्या नोटा सापडल्या. जवळपास १२-१५ नोटांची बंडल यात होती. पाण्यामुळे या सर्व नोटा खराब झाल्या आहेत.