पूर्वी घड्याळ वेळ बघण्याचं साधन होती. पण आता बदलत्या काळात आणि टेक्नॉलॉजीच्या विकासामुळे घड्याळ ही एक स्टेटसची वस्तू झाली आहे. श्रीमंत लोक महागडी घड्याळं त्याचं स्टेटस दाखवण्यासाठी किंवा फॅशनसाठी वापरतात. कारण वेळ तर ते मोबाइलमध्येही बघू शकतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, जगातील पहिलं घड्याळ कसं दिसत असेल किंवा कसं बनवलं असेल? हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? तर आज आम्ही तुम्हाला जगातलं पहिलं घड्याळ कसं होतं हे दाखवणार आहोत.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत दिसणारं घड्याळ हे जगातलं पहिलं घड्याळ मानलं जातं. जगातलं सर्वात पहिलं घड्याळ निर्मित करणारा व्यक्ती म्हणून पीटर हॅनलॅनचं नाव घेतलं जातं आणि आता याच पीटर हॅनलॅनचं एक घड्याळ काही वर्षाआधी सापडलं आहे. या घड्याळ्याला पोमॅंडर हे नाव देण्यात आलंय. या घड्याळाला जगातलं पहिलं घड्याळ म्हणून मान्यता मिळत आहे.
जगातल्या जुन्या घड्याळांचं मुल्यांकन करत असलेल्या एका कमिटीने सांगितले की, सफरचंदाच्या आकाराची हे पोमॅडर घड्याळ जगातलं सर्वात जुनं घड्याळ आहे. या कमिटीमध्ये हरमॅन ग्राएब, डॉ.पीटर मिलिकिसन यांसारखे संशोधक आहे. हे घड्याळ जगासमोर येण्याचीही एक मजेदार कहाणी आहे.
घड्याळ तयार करणाऱ्या एका तरूणाने लंडनच्या एका जुन्या वस्तूंच्या मार्केटमधून 10 पाऊंडमध्ये एक बॉक्स विकत घेतला होता. त्याच बॉक्समध्ये हे घड्याळ मिळालं. त्याने 2002 मध्ये हे घड्याळ विकलं आणि ते घेणाऱ्याने आणखी कुणालातरी विकलं. पुढे जाऊन हे घड्याळ एका संशोधकाने खरेदी केलं आणि त्याने या घड्याळाला ओळख दिली.
हे घड्याळ सोनं आणि कॉपरपासून तयार करण्यात आलं आहे. १५०५ मध्ये हे घड्याळ तयार करण्यात आलं होतं. हे घड्याळ पीटर हॅनलॅन यांची असल्याचं सांगितलं जात आहे. तर या घड्याळाची किंमत ३० ते ५० मिलियन यूरो इतकी असल्याचं सांगितल जात आहे.