Dire Wolf Returns : 10 हजार वर्षांपूर्वी जंगलांवर राज्य करणारा डायर वुल्फ(लांडगा) पुन्हा जिवंत झाला आहे. आतापर्यंत फक्त जीवाश्म स्वरुपात आढळणारा हा प्राणी आता पृथ्वीवर वावरताना दिसणार आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे, हा तोच डायर वुल्फ आहे, जो प्रसिद्ध वेब सिरीज 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये स्टार्क हाऊसचा एक निष्ठावंत साथीदार म्हणून दाखवण्यात आला आहे.
याचे संपूर्ण श्रेय एका अमेरिकन बायोटेक कंपनीला जाते. कंपनीने क्लोनिंग आणि जीन्स एडिटिंगच्या मदतीने हा चमत्कार घडवून आणला आहे. डलास (टेक्सास) येथील कोलोसल बायोसायन्सेस नावाच्या कंपनीमुने तीन डायर वुल्फ पिल्लांना जन्म दिला आहे. रोम्युलस आणि रेमसला या दोन नर पिलांचा जन्म 1 ऑक्टोबर 2024 रोजी झाला, तर तिसऱ्या मादी पिलाचा जन्म 30 जानेवारी 2025 रोजी झाला. आता तुम्हालाही 10 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायर वुल्फचा आवाज आवाज ऐकता येणार आहे.
डायर वुल्फ पृथ्वीवर कसा परतला?शास्त्रज्ञांना सापडलेल्या 10 हजार वर्षे जुन्या दात आणि 72 हजार वर्षे जुन्या कवटीतून काढलेल्या DNA द्वारे हा चमत्कार घडला. कंपनीने CRISPR तंत्रज्ञानाचा वापर करून 14 जीन्समध्ये 20 एडिट्स केले. याद्वारे पेशींचे क्लोनिंग करुन पाळीव मादी कुत्र्याने या डायर वुल्फला जन्म दिला. नामशेष झालेली प्रजाती पुन्हा परतण्याचा हा जगातील पहिलाच यशस्वी प्रयत्न असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
अनेक प्राणी परतणार? या पिल्लांना 2000 एकर परिसरात अतिशय सुरक्षेत ठेवण्यात आले आहे. ही विज्ञानाच्या क्षेत्रात ही एक मोठी झेप मानली जात आहे. शास्त्रज्ञांचे म्हणने आहे की, ही पिल्ले पूर्णपणे डायर वुल्फ नाहीत, तर त्यांच्यासारखी दिसणारी संकरित प्रजाती आहेत. त्यांचा जीनोम 99.9% डायर वुल्फसारखा आहे, त्यामुळेच त्यांना 'डायर वुल्फ फेनोटाइप' म्हटले जात आहे. दरम्यान, आता कोलोसल बायोसायन्सेसने नामशेष झालेले मॅमथ, डोडो आणि टास्मानियन वाघ यांसारखे प्राणी पुन्हा आणण्याची योजना आखली आहे.
या प्रयोगावर वाद कंपनीने यासाठी आतापर्यंत $435 मिलियन खर्च केला आहे. त्यामुळे आता काही तज्ञांनी या प्रयोगावर गंभीर प्रश्नही उपस्थित केला आहे. नामशेष झालेल्या प्रजातींचे पुनरुत्थान करण्यासाठी इतके पैसे खर्च करणे योग्य आहे का? असे तज्ञांचे म्हणने आहे. तसेच, ही पिल्ले पर्यावरणीयदृष्ट्या काही उपयुक्त ठरतील का, की ते फक्त विज्ञानाचे प्रदर्शन असतील? असेही म्हटले जात आहे.