घराघरातील सासू-सुनांच्या भांडणांनी गावकरी होते त्रस्त, अखेर योजला असा उपाय, आता नांदते शांतीच शांती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 01:45 PM2022-03-31T13:45:59+5:302022-03-31T13:46:25+5:30
jara Hatke News: सासू-सुनेचं भांडण ही आपल्या समाजातील घराघरातील कहाणी आहे. कितीही चांगली सासू आणि सून असली तरी कधी ना कधी भांड्याला भांड हे लागतंच. अशाच घराघरातील सासू-सुनांच्या भांडणांमुळे त्रस्त असलेल्या एका गावातील गावकऱ्यांनी असा उपाय योजला की आता या गावात शांतता नांदते.
भोपाळ - सासू-सुनेचं भांडण ही आपल्या समाजातील घराघरातील कहाणी आहे. कितीही चांगली सासू आणि सून असली तरी कधी ना कधी भांड्याला भांड हे लागतंच. अशाच घराघरातील सासू-सुनांच्या भांडणांमुळे त्रस्त असलेल्या एका गावातील गावकऱ्यांनी असा उपाय योजला की आता या गावात शांतता नांदते. ज्येष्ठांची सेवा केली तर मेवा मिळेल, ही म्हण मध्य प्रदेशमधील सीधी जिल्ह्यातील या गावात खरी होत आहे. येथील पनवार चौहानन गावामध्ये अनोखं पाऊल उचलण्यात आलं आहे. येथे सासू-सासऱ्यांची सेवा करणार्या सुनांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं.
याबाबत पनवार चौहानन गावातील ग्रामस्थांनी एका ग्रामसभेच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. यामध्ये सासू-सासऱ्यांची सेवा करणाऱ्या सुनेला पुरस्कार देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यासाठी एक निरीक्षण समितीही स्थापित करण्यात आली. ही समितीची पुरस्कारासासाठी सासू-सासऱ्यांची चांगली सेवा करणाऱ्या सुनेची निवड करते.
याबाबत सरपंचांनी सांगितलं की, ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे ३२०० एवढी आहे. गावामध्ये सासू-सुनेच्या भांडणाच्या वार्ता नेहमी कानावर यायच्या. त्यामुळा घराघरांत अशांतता असायची. कुटुंबांचे आपापसातील संबंध खराब व्हायचे. ते पाहून हे पाऊल उचलण्यात आले.
त्यांनी सांगितले की, गावकऱ्यांनी उचललेल्या या पावलानंतर सुमारे दोन महिन्यांपासून गावातील घरांमध्ये भांडणे होत नाही आहेत. आता हा पुरस्कार आपल्यालाही मिळावा, असे अनेक महिलांना वाटते. त्यामुळे त्यांच्याकडून सासू सासऱ्यांची काळजी घेतली जात आहे. तसेच त्यांची सेवा केली जात आहे. हा पुरस्कार मिळवणारी पहिली सून राजकुमारी यादव बनली आहे. तिला ग्रामपंचायतीकडून पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल.
राजकुमारी यादव हिने सासऱ्यांचे प्राण वाचवल्याने तिला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. राजकुमारीचे पती राज बहादूर यादव हे कामानिमित्त बाहेर असतात. डिसेंबर महिन्यात राजकुमारीच्या ६७ वर्षीय सासऱ्यांना हार्टअॅटॅक आला. हे पाहून आधी राजकुमार घाबरली. मात्र तिने लगेच स्वत:ला सावरले. त्यानंतर घरात प्रथम पंपिंग केलं, नंतर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर ती सासऱ्यांना घेऊन जबलपूरच्या एका खासगी रुग्णालयात आली. तिची हिंमत आणि धाडसामुळे सासऱ्यांचे प्राण वाचले.