Google Maps द्वारे तुम्ही जगातली अनेक ठिकाणे पाहू शकता. यादरम्या तुम्हाला पृथ्वीवरील अनेक चित्र-विचित्र गोष्टी दिसू शकतात. अशाच प्रकारची एक गोष्ट फ्रान्समध्ये आढळून आली आहे. गूगल मॅप्सवरुन शोध घेत असताना एका महाकाय 'सापाच्या सांगाड्याचा' शोध लागला आहे.
@googlemapsfun नावाच्या TikTok अकाउंटवर Google मॅप्स एक्सप्लोर करताना सापडलेल्या विविध गोष्टींचे व्हिडिओ शेअर केले जातात. 24 मार्च रोजी शेअर केलेल्या एका व्हिडिओनुसार, फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ एका महाकास सापाचे सांगाडे आढळून आले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा सांगाडा पृथ्वीवरुन विलुप्त झालेल्या 'टायटानोबोआचा' असू शकतो, असा अंदाज लावला जात आहे.
व्हिडिओ पहा:
या व्हिडिओला TikTok वर 2 मिलीयनहून अधिक व्ह्यूज मिळाले. पण, तपासणीत असे आढळून आले की, गूगल मॅप्समध्ये दिसणारा सापाचा सांगाडा खरा नसून, तो "ले सर्पेंट डी'ओशन म्हणून ओळखले जाणारे धातूचे शिल्प" आहे. हे शिल्प फ्रान्सच्या पश्चिम किनार्यावर स्थित आहे आणि त्याची उंची 425 फूट आहे. 2012 मध्ये हे या ठिकाणी बसवण्यात आले असून, हुआंग योंग पिंग या कलाकाराने याची निर्मिती केली आहे. त्यामुळे, गुगल मॅपवर दिसणारा हा 'सापाचा सांगाडा' प्रत्यक्षात एक कलाकृती असल्याचे उघड झाले.