गरजेच्या वेळी रोख रक्कम हवी असेल, तर आपण एटीएममधून पैसे काढू शकतो. आपल्या खात्यात पैसे असले तरच आपल्याला एटीएममधून पैसे मिळू शकतात. मात्र खात्यात किरकोळ रक्कम असताना एका व्यक्तीला चक्क एटीएममधून कोट्यवधी रुपये मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एटीएममधील तांत्रिक बिघाडाचा फायदा घेऊन या व्यक्तीने एटीएममधून दररोज थोडे थोडे करून कोट्यवधी रुपयांची रक्कम काढली. या चोरीच्या पैशांममधून त्याने भरपूर मौजमस्ती केली. मित्रांना पार्ट्या दिल्या. मात्र अखेरीच त्यानेच प्रसारमाध्यमांसमोर या गोष्टीची कबुली दिली. त्यानंतर अटक करून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. हा धक्कादायक प्रकार ऑस्ट्रेलियामध्ये घडला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डॅन सँडर्स नावाच्या एका व्यक्तीने हल्लीच आपल्या जीवनात घडलेल्या या गोष्टीची आठवण सांगितली आहे. त्याने सांगितले कि, मी २०११ मध्ये मित्रांसोबत पार्टीसाठी गेलो होतो. त्यावेळी मी नॅशनल ऑस्ट्रेलियन बँकेच्या ATM मधून सुमारे १० हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्याने ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाल्याचा मेसेज दिसला.
त्यामुळे डॅनने आपल्या क्रेडिट अकाऊंटमधून डेबिट अकाऊंटमध्ये पैसे पाठवले. मात्र ही प्रोसेसही होऊ शकली नाही. मात्र तरीही पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला रोख रक्कम मिळाली. ATM मध्ये ट्रान्झॅक्शन कॅन्सल दिसल्यानंतरही कॅश येत असल्याचे पाहून डॅन याने दोन-तीन वेळा पैसे काढण्याचा प्रयत्न केला. आश्चर्य म्हणजे प्रत्येक वेळी त्याला रोख रक्कम मिळाली. मात्र त्याच्या खात्यामधून एक पैसाही कापला गेला नाही.
एटीएममधील तांत्रिक बिघाडामुळे असं होत होतं. त्याचाच फायदा घेत डॅन याने दहा-वीस वेळा नाही तर शेकडो वेळा एटीएममधून रोख रक्कम काढली. त्याने पाच महिन्यांत मिळून ९ कोटींहून अधिकची रोकड एटीएममधून उचलली. तो दररोज रात्री १२ ते २ या वेळेत एटीएममधून पैसे काढायचा. कारण रात्री १२ ते ३ या काळात एटीएम बँक नेटवर्कपासून डिस्कनेक्ट व्हायचं. त्यामुळेच त्याच्याकडे ही संधी असायची. त्या वेळेत तो हवे तेवढे पैसे दोन अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करायचा. यादरम्यान, डॅनने बँकेत फोन करून त्याच्या खात्यात काही गडबड तर नाही ना याचीही खातरजमा करून घेतली. पण जेव्हा बँकेने सारं काही सुरळीत असल्याचं सांगितलं. तेव्हापासून तो बिनबोभाटपणे एटीएममधून पैसे काढू लागला.
एटीएममधून पैसे काढून डॅनने खूप अय्याशी केली. मित्र्यांसोबत पार्ट्या केल्या. खासगी विमानातून फिरला. मद्यपान, खाणे पिणे यावर पैसे उडवले, काहींच्या शिक्षणाचा खर्चही दिला. मात्र अखेरीस पश्चातबुद्धी होऊन त्याने ही बाब जाहीर करून गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र काही काळाने २०१६ मध्ये तो बाहेर आला. त्यानंतर त्याने बारटेंडरची नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र एटीएममधील बिघाडाबाबत बँकेने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तर ता तांत्रिक बिघाड होता, असं तज्ज्ञांनी सांगितलं.