भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या अँटिलियाबाबत सर्वसामान्यांमध्ये कुतूहल आहे. या आलिशान महालाच्या वैशिष्ट्यांबाबत अनेक गोष्टी चर्चेत असतात. दरम्यान, आपलाही बंगला अंबानींच्या अँटिलियासारखा दिसावा म्हणून एका व्यक्तीने आपल्या वडिलोपार्जित घराला अँटिलियासारखं रूप देत १४ मजली इमारत उभी केली. या इमारतीची डिझाइन ही अँटिलियाशी मिळतीजुळती आहे.
अँटिलियासारखा दिसणारा बंगला उभारणाऱ्या या व्यक्तीचं नाव सियाराम पटेल आहे. ते उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथील रहिवासी आहेत. औषधांचा व्यापार करणाऱ्या सियाराम पटेल यांनी कुठलीही शास्त्रशुद्ध पद्धत न वापरता हे घर बांधले आहे. त्यामुळे पटेल यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये भीतीचं वातावऱण आहे. तसेच जेव्हा कधी वेगाने वारा वाहतो तेव्हा ते आपली घरं सोडून दूर पळतात. वादळ आणि वाऱ्यामुळे हे घर कोसळून आपल्या घरांवर पडेल, अशी भीती त्यांना वाटत असते. एवढंच नाही, या घराला पाहूनही अनेकजण जखमी झाले आहेत. कुणाची सायकल भिंतीवर आदळली. तर कधी कधी काही लोक घर पाहता पाहता एकमेकांवर येऊन धडकतात.
राजा महाराजांप्रमाणे प्रसिद्ध होण्यासाठी सियाराम पटेल यांनी एक किल्ल्यासारखं घर उभं केलं होतं. त्यांच्या एका शेजाऱ्याने सांगितले की, सियाराम पटेल आपलं घर आणखी उंच बनवण्याचा विचार करत होते. मात्र स्थानिकांनी याची प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर हे बांधकाम थांबले.
शेजाऱ्यांनी सांगितले की, सियाराम याने ४ विवाह केले आहेत. तसेच त्याला ६ मुले आहेत. आता ते या गावात नाही तर शेजारच्या सोनभद्र जिल्ह्यात राहतात. त्यांच्या तिसऱ्या पत्नीच्या एका मुलीने त्यांच्यावर पोटगी देत नसल्याचा आरोप केला होता. दरम्यान, हे १४ मजली घर एसडीएम यांनी दिलेल्या आदेशानंतर सिल करण्यात आले आहे.
हे घर आता एवढं प्रसिद्ध झालंय की, अनेक गावातून लोक हे घर पाहायला येतात. आजूबाजूच्या गावांमध्ये अशा प्रकारचे एकही १४ मजली घर नाही आहे. सियारामला जर प्रसिद्धच व्हायचं होतं. तर त्यांनी एखादी शाळा किंवा हॉस्पिटल बांधलं पाहिजे होतं, असेही लोक म्हणतात.