अनेकदा तुम्ही चोर फोन हातातून हिसकावून पळाल्याच्या घटना ऐकल्या असेल. कधी तुमच्यासोबतही अशी घटना घडली असेल. सार्वजनिक ठिकाणी किंवा रेल्वेतून अशा घटना नेहमीच समोर येत असतात. यानंतर फोन चोरी गेल्याची तक्रार नोंदवून आपल्याला नवा फोन विकत घ्यावा लागतो. जुन्या फोनमधील डेटा त्या फोनसोबतच जातो.
एका ट्विटर यूजरने नुकतीच त्याच्यासोबत घडलेली अशीच एक घटना सांगितली. पण यात जरा ट्विस्ट आहे. चोर फोन हिसकावून पळाला. पण काही वेळाने चोर परत आला आणि तो फोन परत देऊन गेला. कारण फोनचं मॉडल OnePlus 9 Pro नव्हतं.
या अजब स्थितीचा शिकार झालेला ट्विटर यूजर Debayan Roy ने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्याने सांगितले की, नोएडा सेक्टर ५२ मेट्रो स्टेशनजवळ तो फोनवर चॅट करत होता. तेव्हाच ब्लॅक मास्क लावून एक व्यक्ती आला आणि तो फोन हिसकावून पळून गेला.
देबायन थोड्या वेळासाठी शॉक्ड झाला. काही वेळाने त्याच्या लक्षात आलं की, काय झालं. तेव्हा तो चोरा मागे धावू लागला. जेणेकरून त्याला पकडून फोन परत मिळावा. यानंतर जे झालं त्याची कल्पना देबयानने सुद्धा केली नसेल.
देबायन चोरामागे धावत होता. अशात अचानक चोर उलट्या दिशेने म्हणजे देबायनकडे धावत येत होता. तो देबायनच्या समोर आला आणि म्हणाला की, भाई, मला वाटलं OnePlus 9 Pro मॉडल आहे. असं म्हणून तो फोन जमिनीवर फेकून पुन्हा पळून गेला.
दरम्यान, देबायनने सांगितले की त्याचा फोन Samsung Galaxy s10 Plus आहे. यावर अनेक ट्विटर यूजर्सनी कमेंट केल्या आहेत. काही या घटनेने शॉक्ड आहेत. तर काही लोकांनी सॅमसंगची खिल्ली उडवली. काही म्हणाले की, चोरांना माहीत आहे की, चांगला फोन कोणता आहे.