नवी दिल्ली-एका कंपनीनं यंदाच्या वर्षात मोठा निर्णय घेत कंपनीतील काही निवडक कर्मचाऱ्यांना एकाच झटक्यात ५० महिन्यांचा पगार बोनस स्वरुपात देऊ केला आहे. २०२२ या वर्षात कंपनीला चांगला व्यवसाय आणि नफा कमावता आल्यामुळे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 'स्टेलर बोनस' देण्यात आला.
तैवानच्या एव्हरग्रीन मरीन कॉर्पोरेशन कंपनीनं जवळपास चार वर्षांचा (५० महिने) पगार कर्मचाऱ्यांना बोनस स्वरुपात दिला आहे. कंपनीशी जोडल्या गेलेल्या व्यक्तीनं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांपैकी उत्कृष्ट कामगिरी केलेले आणि जे लोक तैवानमध्ये कार्यरत आहेत अशांनाच हा बोनस देण्यात आला आहे. बोनस संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांचा जॉब ग्रेड आणि कामाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहे.
एव्हरग्रीन मरीन कॉर्पोरेशननं याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. कंनपीनं शुक्रवारी स्टेटमेंट जारी करत वर्षाच्या शेवटी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा बोनस त्यांचं व्यक्तीगत प्रदर्शन आणि कंपनीच्या कामगिरीच्या आधारावर दिला जातो असं म्हटलं आहे.
कंपनीनं दाखवलेल्या या दिलदारपणामागे देखील एक कारण दडलेलं आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या काही वर्षात शिपिंग इंडस्ट्रीमध्ये वाढ पाहायला मिळते आहेत. माल शिपिंगच्या माध्यमातून वाहतूक करण्यास जास्तीत जास्त पसंती दिली जात आहे. त्यामुळे मालभाड्यातही वाढ झाली आहे. ग्राहकांकडून वस्तूंची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे कंपनीचा नफा २०२० च्या तुलनेत तब्बल १ लाख ७० हजार कोटींनी वाढला आहे.
तैवान सरकारनं याच्याशी संबंधित एक रिपोर्ट प्रकाशित केला. ३० डिसेंबर रोजी अनेक कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा बोनस देण्यात आला. अर्थात कंपनीतील सर्वच कर्मचाऱ्यांना इतका बोनस मिळालेला नाही. दरम्यान शांघाय येथील कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी यास भेदभाव असल्याचं म्हटलं आहे. काहींनी आपल्याला फक्त महिन्याच्या पगारावर ५ ते ८ टक्के बोनस मिळाला असल्याचं म्टटलं आहे.