नवी दिल्ली : स्ट्रॉबेरीचे नाव ऐकताच लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. स्ट्रॉबेरी हे एक असे फळ आहे, जे खाण्याची प्रत्येकाला इच्छा असते. त्यामुळेच लोक संधी मिळेल तेव्हा स्ट्रॉबेरी खरेदी करायला विसरत नाहीत. लोकांमध्ये स्ट्रॉबेरीची इतकी क्रेझ आहे, की स्ट्रॉबेरीचा प्लेवर विविध खाद्यपदार्थांमध्ये टाकला जातो. विशेषत: बाजारात स्ट्रॉबेरी फ्लेवर असलेले आईस्क्रीम मोठ्या प्रमाणात विकले जातात.
या स्ट्रॉबेरीमुळे एक व्यक्ती चांगलीच चर्चेत आली आहे. चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे त्याने जगातली सर्वात मोठी स्ट्रॉबेरी पिकवली. इस्रायलमधील कदिमा-झोरान येथील एरियल चाहीने एक महाकाय स्ट्रॉबेरी पिकवली. त्या स्ट्रॉबेरीचे वजन सुमारे 300 ग्रॅम होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही ही जगातील सर्वात वजनदार स्ट्रॉबेरी असल्याची पुष्टी केली आहे. या स्ट्रॉबेरीची लांबी 18 सेमी आणि जाडी 4 सेमी आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वेबसाइटनुसार, ही स्ट्रॉबेरी इलान जातीची आहे आणि एरियलच्या कौटुंबिक व्यवसाय "स्ट्रॉबेरी इन द फील्ड" द्वारे उगवली गेली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ही जगातील सर्वात वजनदार स्ट्रॉबेरी दिसत आहे.