जगात जिवंत राहण्यासाठी लोक वेगवेगळी कामे करतात. कामाच्या बदल्यात त्यांना पगार मिळतो जो मनुष्यासाठी फार महत्वाचा आहे. कुणी स्वत:चा उद्योग करतात तर कुणी दुसरीकडे नोकरी करतं. आपल्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी मनुष्यांना पैशांची गरज असते आणि हा पैसा काम केल्याशिवाय मिळत नाही. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, जगात एक असंही काम आहे जे करून तुम्ही खूपसारा पैसा कमावू शकता, ते काम म्हणजे कोणतंही काम न करणं.
तुम्हाला कदाचित ही गंमत वाटत असेल. जगात एक असं काम आहे ज्यात व्यक्तीला काहीच काम करावं लागत नाही, तरीही पैसे मिळतात. कदाचित अनेकांसाठी हा ड्रीम जॉब असेल. जपानमध्ये एका व्यक्तीने या कामाच्या माध्यमातून चार वर्षात साधारण अडीच कोटी रूपये कमाई केली. चला जाणून घेऊ नेमकं काय आहे हे काम.
जपानच्या टोकियोमध्ये राहणारा 39 वर्षीय शोजी मोरिमोटो आपल्या अनोख्या कामामुळे चर्चेत आहे. शोजी जे काम करतो, ते जगातील सगळ्यांना करावं वाटेल. त्याला काही काम न करण्याचे पैसे मिळतात. लोक शोजीला केवळ आपल्यासोबत राहण्याचे पैसे देतात. एका बुकिंगसाठी शोजी साधारण साडेपाच हजार रूपये घेतो. त्याचं काम आहे लोकांना कंपनी देणं. यादरम्यान त्याच्याशी जेवढं बोललं गेलं तेवढंच तो उत्तर देतो.
शोजीला आपले जास्तीत जास्त क्लाइंट ऑनलाइनच मिळतात. त्याच्या एकाच क्लाइंटने त्याला तीनशे पेक्षा जास्त वेळा हायर केलं आहे. शोजी केवळ त्यांच्यासोबत राहतो. तो लोकांना डीनरवर, एखाद्या पार्टीमध्ये, शॉपिंग दरम्यान कंपनी देतो.
एका रिपोर्टनुसार, शोजी गेल्या चार वर्षापासून हे काम करत आहे. या दरम्यान त्याने दोन कोटी पंचवीस लाखांपेक्षा जास्त कमाईही केला आहे. कंपनी कुणाला द्यायची आणि कुणाला नाही हे त्याच्यावर डिपेंड असतं. एका व्यक्तीने शोजीला फ्रीज हटवण्यासाठी हायर केलं होतं, पण शोजीने ते काम रिजेक्ट केलं.