सामान्यपणे जास्तीत जास्त लोकांकडे एक मोबाईल फोन असतो. पण काही लोकांकडे २ किंवा ३ फोन असतात. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जगात एक अशीही व्यक्ती आहे ज्याच्याकडे एक, दोन किंवा तीन नाही तर तब्बल हजारो फोन आहेत. या व्यक्तीकडे इतके फोन आहे की, त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.
आम्ही ज्या व्यक्तीबाबत तुम्हाला सांगत आहोत ती व्यक्ती स्पेनच्या बार्सिलोना शहरात राहते. तर त्याचं नाव वेन्सेस पलाउ फर्नांडिस असं आहे. त्याचं घर आता फोन गोदाम झालं आहे. खास बाब म्हणजे पलाउकडे जास्तीत जास्त फोन्स हे नोकिया कंपनीचे आहेत. यातील फोनचा त्याने वापर केला असून यातील सगळेच फोन अजूनही चालू आहेत.
फोनचा वर्ल्ड रेकॉर्ड
वेन्सेस पलाउ फर्नांडिसकडे जवळपास एकूण ३६५१ फोन्स आहेत. यातील तर अनेक असेही मॉडेल आहेत जे आता तुम्हाला बाजारात मिळणारही नाहीत. इतके फोन असल्याने त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. याआधी सगळ्यात जास्त फोन असण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड रोमानियाच्या आंद्रेई बिल्बीच्या नावे होता. २०२३ मध्ये त्याच्यकडे ३४५६ फोन होते.
पलाउने त्याचा पहिला फोन १९९९ मध्ये घेतला होता. हा नोकियाचा फोन होता. पलाउने सांगितलं की, त्याने हा फोन खरेदी केला नव्हता, तर त्याला गिफ्ट मिळाला होता. या फोनचं मॉडेल ३२१० होतं. यानंतर २०१८ पर्यंत त्याने ७०० पेक्षा जास्त फोन गोळा केले. आज त्याच्याकडे तीन हजारांपेक्षा जास्त फोन आहेत. हे फोन वेगवेगळ्या कंपन्यांचे आहेत.
त्याशिवाय पलाउकडे नोकियाचा स्पेशन एडिशन नोकिया ३३२० स्टार वार्स ईपी फोनही आहे. जगात काही मोजक्याच लोकांकडे हा फोन आहे. यावरून हे दिसून येतं की, या व्यक्तीला फोन गोळा करण्याचं किती वेड आहे.