Indian Railway : देशात रेल्वेचं मोठं जाळं आहे. शेकडो रेल्वे स्टेशनवरून लाखो लोक रोज वेगवेगळ्या ठिकाणी जातात. भारतातील काही रेल्वे स्टेशनही नावंही अजब आहेत. तर काही स्टेशनच्या अनोख्या कहाण्या आहेत. अशीच एक कहाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. देशातील एक रेल्वे स्टेशन एका मुलीमुळे बंद ठेवण्यात आलं होतं. चला जाणून घेऊ काय आहे ही घटना...
देशातील एखादं रेल्वे स्टेशन एका मुलीमुळे बंद झालं असल्याचं ऐकल्यावर अर्थातच कुणालाही विचित्र वाटेल. त्यातल्या त्यात हे स्टेशन सुरू होऊन केवळ सातच वर्षे झाली होती. अनेकांना ही गंमतही वाटू शकते, पण ही गंमत नाही तर खरं आहे. हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या पुरूलिया जिल्ह्यातील असून याचं नाव बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन असं आहे. हे स्टेशन भारतातील सर्वात हॉंन्टेड रेल्वे स्टेशनपैकी एक आहे.
हे रेल्वे स्टेशन १९६० मध्ये सुरू करण्यात आलं होतं. रेल्वे सेवा सुरू झाल्यावर काही वर्षे या स्टेशनवर सगळं काही व्यवस्थित होतं. पण अचानक एक विचित्र घटना घडू लागली. १९६७ मध्ये बेगुनकोडोर रेल्वे स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याने स्टेशनवर एका महिलेचं भूत पाहिल्याचा दावा केला होता. सोबतच अशीही अफवा पसरली होती की, याच स्टेशनवर या मुलीचा एका रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी रेल्वे कर्मचाऱ्याने लोकांना याबाबत सांगण्याचा प्रयत्नही केला, पण लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं.
पण खरी अडचण तेव्हा वाढली जेव्हा बेगुनकोडोरचे स्टेशन मास्टर आणि त्यांचा परिवात रेल्वे क्वार्टरमध्ये मृत आढळले. नंतर येथील लोकांनी असाही दावा केला होता की, त्यांच्या मृत्यूमागे त्याच महिलेच्या भूताचा हात आहे. लोक सांगू लागले होते की, जेव्हा एखादी रेल्वे येथून जाते तेव्हा त्या मुलीचं भूतही रेल्वेसोबत धावू लागतं.
या विचित्र घटनांनंतर बेगुनकोडोर हे रेल्वे स्टेशन चांगलंच चर्चेत आलं आणि हेच रेल्वेच्य रेकॉर्डमध्येही नोंदवलं आहे. लोकांमध्ये या मुलीच्या कथित भूताची इतकी भिती पसरली की, लोक स्टेशनवर येणं बंद झालं. इतकेच नाही तर स्टेशनवरील कर्मचारीही भीतीमुळे पळून जात होते.
असे मानले जाते की, जेव्हाही एखाद्या रेल्वे कर्मचाऱ्याची पोस्टिंग इथे होत होती, ते लगेच इथे येण्यास नकार देत होते. नंतर तर इथे रेल्वे थांबणंह बंद झालं. कारण भीतीमुळे कुणाला इथे उतरायचं देखील नव्हतं आणि ना कुणी रेल्वेत बसण्यासाठी येत होते. त्यानंतर संपूर्ण स्टेशन सामसूम झालं.असे म्हणतात की, या रेल्वे स्टेशनवरील कथित भूताची चर्चा पुरूलिया जिल्ह्यापासून ते कोलकाता आणि पुढे रेल्वे मंत्रालयापर्यंत झाली होती. असेही सांगितले जाते की, जेव्हा येथून एखादी रेल्वे जात होती तेव्हा लोको पायलट स्टेशन येण्याआधीच स्पीड वाढवत होते. तसेच लोकही स्टेशन येण्याआधीच दारं-खिडक्या लावून घेत होते.
तब्बल ४२ वर्षांनी म्हणजे २००९ मध्ये गावातील लोकांच्या मागणीवरून तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा हे रेल्वे स्टेशन सुरू केलं. तेव्हापासून आतापर्यंत भूताचा असा काही दावा करण्यात आलेला नाही. पण आजही लोक सायंकाळी या स्टेशनवर जाणे टाळतात. सध्या इथे १० रेल्वे थांबतात. या स्टेशनची इतकी चर्चा झाली होती की, लोक त्यामुळेच हे स्टेशन बघण्यासाठीही येतात.