एलियन्स हा सर्वांच्या उत्सुकेतेचा विषय आहे. संशोधकही यावर फार संशोधन करत आहेत. त्यांनाही अद्याप एलियन्सबद्दल कोणतंही रहस्य उलगडण्यास यश मिळालं नाही. आपल्या पृथ्वीशिवाय अवकाशात इतर ठिकाणी सजीवसृष्टी असावी असा अंदाज संशोधक लावतात. पण यातील काही ठोस त्यांना अद्याप सापडलेले नाही. मात्र एक माणूस असा आहे जो खात्रीनं सांगतोय की पृथ्वीवर एलियन्स येणार. ते कोणत्या तारखेला येणार? कसे येणार? ते आल्यावर काय होणार याबाबतही तो ठामपणे भाकित करतोय. जे शास्त्रज्ञांना जमलं नाही ते या माणसाला कसं जमलं? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर वाचा पुढे...
फ्यूचर टाइम ट्रॅव्हलर (Future time traveler) नावानं टिकटॉकवर एक अकाउंट आहे. त्या व्यक्तीनं हा दावा केला असून, त्याच्या म्हणण्यानुसार मानव आणि एलियन्स यांच्यात भयंकर युद्ध (War) होणार असल्याची माहिती आपल्याला असल्याचा दावा त्यानं केला आहे. इतकंच नव्हे तर, तो स्वत: 2491 या सालात सध्या जगत असल्याचं त्यानं म्हटलंय. या व्यक्तीनं एलियनची भेटीची तारीखही अगदी ठामपणे सांगितली आहे. त्याच्या मते, पुढच्या वर्षी २४ मे २०२२ रोजी दुसर्या ग्रहावरचे लोक अर्थात एलियन्स पृथ्वीवर येतील. पहिल्यांदाच ते पृथ्वीवर दिसतील. ते येताना शांततेनं येतील मात्र नंतर माणसाविरुद्ध युद्ध पुकारतील. ते दिसायला माणसापेक्षा खूप वेगळे असतील. त्यांची उंची 7 फूट असेल आणि दिसायला अतिशय भयानक असतील. सध्या 2491 मध्ये जगत असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीच्या मते, आगामी काळात अनेक प्रकारचे एलियन्स पृथ्वीवर येतील आणि ते पृथ्वीवरच वास्तव्य करतील. त्यांना निरॉन्स (Nirons) म्हणून ओळखले जाईल.
अगदी ठामपणे एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल, त्यांच्या पृथ्वीवरील आगमनाबद्दल दावा करणाऱ्या या व्यक्तीकडे याबाबतचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. मात्र तो पृथ्वीवर येणाऱ्या तथाकथित एलियन्सचं वर्णणही करतोय. तब्बल 7 फूट 4 इंच उंच आणि मोठी कवटी असलेले हे एलियन्स गडद राखाडी रंगाचे असतील. एकदा त्यांना युद्धासाठी चिथावल्यानंतर ते अत्यंत धोकादायक ठरतील, असं यानं म्हटलंय. तसंच या एलियन्सविरुद्ध अमेरिका (USA) पहिल्यांदा युद्ध पुकारेल असा दावाही त्यानं केलाय. या टाईम ट्रॅव्हलरला स्वत:चंही आयुष्य यामुळे धोक्यात येणार असल्याची भीती वाटतेय. ती त्यानं टिकटॉकवर व्यक्तही केलीय. त्याच्या या भाकीतावर अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत तर काही जण त्याचं भाकित खरं मानून भीतीही व्यक्त करत आहेत.