मनुष्याच्या शरीरातून ऑपरेशन करून ट्यूमर काढल्याच्या अनेक घटना तुम्ही वाचल्या किंवा ऐकल्या असतील. पण कधी एखाद्या माशाच्या शरीरातून ट्यूमर काढल्याचं नक्कीच ऐकलं किंवा पाहिलं नसेल. पण अशी एक घटना इंग्लंडच्या ब्रिस्टसमध्ये घडली आहे. येथील वेट्स वेटरनरी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी एका अशा माशाच्या पोटातून ट्यूमर काढला, ज्याचं वजन केवळ एक ग्राम होतं.
जवळपास ४० मिनिटांपर्यंत चाललेल्या या ऑपरेशननंतर डॉक्टरांनी ट्यूमर शरीरातून काढला. यासोबतच हा मासा सर्जरी करण्यात आलेला जगातला सर्वात लहान रूग्ण ठरला आहे. हा मासा मोली प्रजातीचा गोल्ड फिश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या छोट्या माशाची किंमत केवळ ८९ रूपये इतकी आहे. पण या ऑपरेशनसाठी जवळपास ९ हजार रूपये खर्च आला. या माशाचं ज्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं, तिथे याआधी सरडा, पाल, साप आणि मगर यांसारख्या जीवांवर सर्जरी करण्यात आली आहे.
या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सोनिया माइल्स यांच्यानुसार, या गोल्ड फिशच्या मालकाला त्याच्या शेजाऱ्याने काही दिवसांपूर्वीच हा मासा गिफ्ट म्हणून दिला होता. सुरूवातीला सगळं काही ठीक होतं. पण काही दिवसांनी माशाच्या पोटाच्या खालच्या बाजूस गाठ आली. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेत.
सोनिया माइल्सने ऑपरेशनबाबत सांगितले की, आधी माशाला एका कंटेनरमध्ये टाकण्यात आलं. त्यानंतर जेव्हा तो शांत झाला तेव्हा त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं आणि ट्यूमर तोंडाच्या नलिकेद्वारे काढण्यात आला. त्यानंतर पोटाला वॉटरप्रूफ पेस्टने बंद करण्यात आलं आणि काही वेळाने त्याला ऑक्सिजनयुक्त पाण्यात टाकण्यात आलं. काही वेळाने त्याला घरी सोडण्यात आलं.