सध्याच्या जमान्यात जमीन आणि घरांच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की कोणत्याही इतर क्षेत्रात गुंतवणूक करण्यापेक्षा रिअॅलिटी क्षेत्रात गुंतवणूक करणं अधिक फायदेशीर समजलं जात आहे. पण प्रॉपर्टी किंवा अमार्टमेंटच्या किमती गगनाला भिडणं याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य जनतेला बसतो कारण त्यांचं घर खरेदीचं स्वप्नं हे स्वप्नंच राहून जातं. अर्थात सर्वच ठिकाणी काही घराच्या किमती अधिक नसतात. विशेषत: खेड्यापाड्यांमध्ये आजही जमिनीच्या किमती कमी आहेत. पण शहरी भागात किमती दिवसेंदिवस गगनाला भिडताना पाहायला मिळत आहेत. अनेकदा घर खूप लहान असूनही त्याची किंमत इतकी असते की लोक आश्चर्यचकीत होतात. अशाच एका आगळ्यावेगळ्या घराची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. हे घर लंडनमध्ये आहे.
'द सन'च्या माहितीनुसार, हे घर दिसायला एखाद्या छोट्या शेड हाऊससारखं आहे. पण त्याची किंमत ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. अवघ्या एका बेडरुमची सुविधा असलेल्या या शेड हाऊसची किंमत तब्बल ४ कोटी ३७ लाख रुपये इतकी आहे. घर पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल की असं नेमकं या घरामध्ये आहे तरी काय की याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. त्याचं कारण असं की घर जरी छोटं असलं तरी त्याचं इंटेरिअर इतकं शानदार आहे की ते पाहून लोक घर आणि त्यात केलेलं सुबक इंटेरिअरच्या प्रेमातच पडतात. एक बेडरुम असला तरी तो कलाकुसरीनं सजवण्यात आला आहे. तसंच बाथरुम देखील अनोख्या पद्धतीनं डिझाइन करण्यात आलं आहे. विक्टोरियन स्टाइलमध्ये घराची उभारणी करण्यात आली असून ब्रिटनमधील नागरिकांसाठी हे घर एक ड्रीम हाऊस झालं आहे.
द ईस्ट लंडन प्रॉपर्टीनं या घराच्या विक्रीची किंमत कोट्यवधींमध्ये लावली आहे. यात एक बेडरुमसोबतच एक बाथरुम आणि ओपन किचनची सुविधा आहे. खरंतर घर खरेदीसाठी नागरिकांमध्ये ओढ यासाठी आहे कारण घरापासून मार्केट देखील खूप जवळ आहे. जिथं दैनंदिन गरजेच्या वस्तू सहजपणे उपलब्ध होतात. तसंच शाळा, रुग्णालय इत्यादी सुविधा देखील घरापासून जवळच आहेत. त्यामुळे येत्या काळात या घराच्या किमतीत आणखी वाढ होईल असं तज्ज्ञ सांगतात.