प्रत्येक आईबापाचा प्रयत्न असतो की, आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. मुलांना कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये. जगातील सर्व सुखसुविधा मुलांना मिळाव्यात. त्यासाठी आई-बाप काहीही करण्यास तयार असतात. अमेरिकेच्या लॉन्स एंजिल्समध्ये राहणाऱ्या मार्क आणि बेथ हंटर या जोडप्यानं त्यांच्या २ मुलींसाठी असेच काहीसे केले आहे. आपल्या मुलींना संपूर्ण जग दाखवता यावं यासाठी दाम्पत्याने जहाजावर पूर्ण अपार्टंमेंट बुक केले आहे. त्यासाठी १ मिलियन पाऊंड म्हणजे १० कोटी रुपये खर्च आला आहे.
द इंडिपेंडेंट रिपोर्टनुसार, मार्क आणि बेथ हंटर यांनी मुलींना सोबत घेऊन जग भ्रमंती करावी अशी इच्छा होती. आता हीच इच्छा पूर्ण होणार आहे. अलीकडेच दोघांनी स्टोरीलाइन नॅरॅटिव्ह शिपवर एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. या मेगा शिपवर २ बेडरुम, २ बाथरूमची भव्य रूम आहे. ज्यात सिनेमा हॉल, स्पा, माइक्रोबुअरी, क्लिनिक आणि लायब्रेरीही आहे. यावर्षीच्या अखेरीस क्रोएशियामध्ये मोठ्या प्रमाणात जहाजाचं निर्मिती होईल. ज्यात ५४३ घरं असतील. २०२४ मध्ये या जहाजाला समुद्रात उतरवलं जाईल. जेव्हा हे जहाज जगाची भ्रमंती करायला निघेल तेव्हा हंटर दाम्पत्यांच्या मुली १४ आणि १६ वर्षांच्या होतील.
बेथनं एका मुलाखतीत सांगितले की, आम्ही सुरुवातीला एक छोटी नौका घेऊन जगाची सैर करण्यास जाणार होतो. परंतु त्यात अनेक अडचणी येतील असं वाटलं. त्यानंतर आम्हाला या जहाजाबद्दल माहिती पडले. याठिकाणी अपार्टमेंट बनत असून ते विक्रीसाठी उपलब्ध आहे. मग आम्ही नौका घेण्याचा निर्णय बदलून याठिकाणी मोठं घर खरेदी केले. आता ५० फूट बोटीऐवजी आमच्याकडे ७०० फूट जहाज असेल आणि आमचा प्रवासही सुखकर असेल. कारण आता साफसफाई, कपडे धुणे, जेवण बनवणे याचाही वेळ वाचणार आहे.
३ वर्षात होणार जगभ्रमंती
ज्या जहाजावर बेथनं अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्याचे नाव नॅरेटिव्ह आहे. या जहाजाने १ हजार दिवसांची जगभ्रमंतीचा दौरा निश्चित केला आहे. प्रत्येक बंदरावर अनेक रात्र विश्राम घेणार आहे. जहाजावरील लोकांना समुद्राच्या लाटेचीही मज्जा घेता येणार आहे. जहाजात २० डायनिंग, बार व्ह्यू, तीन पूल, एक आर्ट स्टूडिओ, एक बॉलिंग एली, फिटनेस सेंटर, रनिंग ट्रॅक, जिम, योग स्टुडिओ, गोल्फ सिमुलेटर म्हणजे एक संपूर्ण छोटं शहर असणार आहे.