>> शरद केळकर
आज वसंतसंपात / Spring Equinox म्हणजेच आज दिवस-रात्र समसमान असणारा दिवस. आज सूर्याचा उत्तरायणाचा अर्धा प्रवास संपून, पुढचा अर्धा प्रवास सुरू होणार आहे.
पृथ्वीचा अक्ष २३.५° ने कललेला असल्याने, साधारण ६ महिने सूर्याचा भासमान प्रवास २३.५° दक्षिणेकडून २३.५° उत्तरेकडे होताना दिसतो - ह्यालाच उत्तरायण म्हणतात, जे साधारण २१/२२ डिसेंबरपासून २१/२२ जूनपर्यंत असते. त्याचप्रमाणे उरलेल्या अर्ध्या वर्षात, म्हणजेच साधारण २१/२२ जूनपासून २१/२२ डिसेंबरपर्यंत सूर्य उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करताना भासतो, त्या कालखंडाला दक्षिणायन म्हणतात...
ज्या दिवशी सूर्य बरोबर विषुववृत्तावर येतो (म्हणजेच ०° अक्षांश) त्या दिवशी हा उत्तरेकडचा किंवा दक्षिणेकडचा प्रवास अर्धा संपलेला असतो, आणि त्याच दिवशी दिवस आणि रात्र समसमान असतात... त्या दिवसाला विषुवदिन म्हणतात... आता पुढचे साधारण ३ महिने, सूर्य २३.५° उत्तरेला, अर्थात कर्कवृत्ताला स्पर्श करेपर्यंत दिवस मोठा मोठा होत जाईल.
उत्तरायणामधल्या विषुवदिनाला वसंतसंपात म्हणतात जो २१/२२ मार्चला असतो... अगदी नेमकी आकडेमोड करायची, तर आज पहाटे २ वाजून ५५ मिनिटांनी सूर्याने विषुववृत्त 'ओलांडले'. एखाद्या लंबकाप्रमाणे, उत्तरायण आणि दक्षिणायन, हे दोन्ही एकानंतर एक येत रहातात. अजून बरोबर ६ महिन्यांनी, २१/२२ सप्टेंबरला, म्हणजेच दक्षिणायनाच्या मध्यात, जो विषुवसंपात दिन येईल, त्याला #शरदसंपात / Autumn Equinox म्हणतात... त्या दिवशीसुद्धा दिवस-रात्र समसमान असतील...