बंगळुरू: एखाद्या व्यक्तीला कशाची आवड असेल सांगता येत नाही. व्यक्तीनुसार इच्छा बदलतात. कोणाला परदेशी फिरण्याची इच्छा असते. एखाद्याला खूप पैसा कमावण्याची इच्छा असते. कर्नाटकच्या धारवाड पोलिसांना मात्र एक वेगळाच अनुभव आहे. एका व्यक्तीनं कर्नाटक पोलिसांची जीप घेऊन पळ काढला. तब्बल १०० किलोमीटर अंतर कापल्यावर त्याला अटक झाली. त्यानंतर त्यानं जीप पळवण्यामागचं कारण पोलिसांना सांगितलं. ते ऐकून डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ पोलिसांवर आली.
धारवाड जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या नागप्पा वाय. हडपड (वय ४५ वर्षे) या व्यक्तीनं पोलिसांची जीप चोरली. अग्निगेरी पोलीस ठाण्याजवळ उभी असलेली जीप घेऊन नागप्पा पसार झाला. पेशानं ट्रक चालक असलेला नागप्पा अनेक राज्यांमध्ये ट्रक घेऊन गेला आहे. राज्यात, राज्याबाहेर त्यानं ट्रक चालवला. मात्र पोलिसांची जीप आयुष्यात एकदा तरी चालवायची अशी इच्छा त्याच्या मनात होती.
पोलीस ठाण्याच्या बाहेरुन जात असताना पोलिसांची जीप चालवण्याची इच्छा नागप्पाच्या मनात निर्माण व्हायची. मात्र आतापर्यंत त्याला तशी संधी मिळाली नव्हती. २ फेब्रुवारीच्या मध्यरात्री त्याला तशी संधी मिळाली. अग्निगेरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ड्युटी संपवून घरी गेले होते आणि ड्युटीवर असलेले दोन हवालदार झोपत होते. हीच संधी साधत नागप्पानं जीप चोरली.
चोरलेली जीप घेऊन नागप्पानं ११२ किलोमीटर अंतर कापलं. सकाळी तो मोतेबन्नूरला पोहोचला. रात्रभर जीप चालवून नागप्पाला झोप आली. पोलिसांची जीप बराच वेळ उभी असून त्यात एक व्यक्ती झोपलेली असल्याचं स्थानिकांनी पाहिलं. जीपमधील व्यक्तीनं पोलिसांचा गणवेश घातलेला नाही हे पाहून स्थानिकांना संशय आला. त्यांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी नागप्पाला बे्ड्या ठोकल्या.