जगात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या परंपरा पाहायला मिळतात. काही परंपरा खूपच विचित्र (Weird Rituals) असतात. त्यांच्याबद्दल समजल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. काही देशांतील परंपरा तर फारच भयानक आहेत. अशीच एक विचित्र परंपरा इंडोनेशियामध्ये (Indonesia) पाळली जाते. या ठिकाणचे लोक त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा मृतदेह स्वत: जवळच ठेवतात. एवढंच नाही तर मृत शरीराला दररोज गरमागरम जेवणही दिलं जातं. या विचित्र परंपरेचे काही फोटो समोर आले आहेत. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
इंडोनेशियामध्ये पाळल्या जाणाऱ्या या परंपरेला 'तोराजा' (Toraja) या नावानं ओळखलं जातं. ही परंपरा या ठिकाणी खूपच प्रसिद्ध आहे. या परंपरेनुसार, जेव्हा घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तिच्यावर अंत्यसंस्कार (Funeral) केले जात नाहीत. कुटुंबीय त्या व्यक्तीचा मृतदेह त्यांच्याजवळच ठेवतात. घरातील इतर सदस्यांप्रमाणे या मृतदेहाला वागणूक दिली जाते. एवढंच नाही तर मृतदेहाला दररोज जेवणही (Food) दिलं जातं. कुटुंबातील इतर सदस्य या मृतदेहाची एखाद्या जिवंत व्यक्तीप्रमाणं सेवा करतात. (Food for Dead Body)
येथील लोकांचा असा विश्वास आहे की, कोणीही मरत नाही, तो फक्त आजारी (Sick) पडतो. त्यामुळे मृत व्यक्तीला आजारी समजून तशी तिची सेवा केली जाते. घरात पाहुणे आले तर तेदेखील मृतदेहाच्या प्रकृतीची विचारपूस करतात. घरातील एका खोलीत मृतदेह ठेवला जातो. हे दृश्य अनेक घरांमध्ये दिसतं. घरात मृतदेह असूनही इतर कुटुंबीय पूर्णपणे सामान्य जीवन जगतात. मृतदेह असलेल्या घरात गेल्यानंतर तिथे एखाद्याचा मृत्यू झाला आहे, असं अजिबात वाटत नाही. या मृतदेहांनाही आंघोळ (Bath) घालण्यात येते आणि त्यांचे कपडेही बदलेले जातात.
आता तुम्ही विचार करत असाल की, मृतदेह इतके दिवस घरात राहिला तरी तो कुजत का नाही? यामागे एक विशेष कारण आहे. या मृतदेहांवर विशिष्ट प्रकारची पानं (Leaves) आणि औषधं रगडली जातात. त्यामुळे मृतदेह खराब होत नाही. जेव्हा त्या व्यक्तीच्या मृत्यूची योग्य वेळ आली आहे, असं इतर लोकांना वाटतं तेव्हा ते मृतदेहावर मोठ्या थाटामाटात अंत्यसंस्कार करतात. या परंपरेत मृतदेह जाळला (Burn) किंवा पुरला (Bury) जात नाही. गावाजवळील डोंगरातील एखादा खडक कापून मृतदेहाची पेटी त्यामध्ये ठेवतात.
इंडोनेशियातील ही परंपरा इतर देशांतील लोकांना विचित्र वाटते. मात्र, तेथील अनेक लोकांचा या परंपरेवर विश्वास असून ते तिचं काटेकोरपणे पालन करतात.