(Image Credit : BBC.com)
'घाट – घाट पर बदले पाणी, कोस कोस पर वाणी,' असं म्हटलं जातं. पण भाषेमध्ये आणि बोलीमध्ये कितीही बदल झाले, तरीही कोणतीही भाषा विशिष्ट शब्द आणि उच्चारांनीच बोलली जाते, असा आपला आतापर्यंतचा समज आहे. हा समज खोटा ठरवणारे एक गाव इंडोनेशियातील बाली बेटावर आहे. गावातील लोक उच्चारांची नव्हे, तर चक्क चिन्हांची भाषा बोलतात. त्यामुळे या गावातील गप्पा गोष्टीच काय, अगदी भांडणेसुद्धा अगदी ‘शांततेत’ असतात.
उत्तर बालीमध्ये बेनकाला नावाचे गाव आहे. तिथे 'कता कोलोक' ही भाषा चिन्हांची बोलली जाते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या गावाला शाप आहे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या येथे जन्माला येणारी बहुतेक बालके कर्णबधीर असतात. खरंतरं शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या गावातील जमातीच्या गुणसूत्रांमधील दोषामुळे येथे जन्माला येणाऱ्या दर पन्नासपैकी एक बाळ कर्णबधीर असतं. परिणामत: गावातील मोठी लोकसंख्या कर्णबधीर आहे. त्यामुळे दैनंदिन संवादासाठी या चिन्हांच्या भाषेचा जन्म झाला. गेल्या तब्बल सहा पिढ्यांपासून ही भाषा वापरता असल्याचे स्थानिक सांगतात.
(Image Credit : BBC.com)
ऐकू येते अशा लोकांना या गावात 'एंगेट' म्हणतात, तर ऐकू न येणाऱ्यांना 'कोलोक' म्हणतात. जगभरातील मूकबधीर चिन्हांची भाषा वापरून संवाद साधतात, पण हा संवाद त्यांच्या पुरताच मर्यादित असतो. त्यामुळे मूकबधिरांचे विश्व अगदी लहान होऊन जाते. मात्र बेनकालामधील सर्वच ग्रामस्थ 'कता कोलोक' मध्ये अगदी सहज संवाद साधत असल्यामुळे कर्णबधिरांना अजिबात न्यूनपणा जाणवत नाही. उलट गावातील चौका-चौकांत 'एंगेट' आणि 'कोलोक' अशा दोन्ही लोकांमध्ये गप्पा रंगलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे कर्णबधिरांना दैनंदिन व्यवहार करताना कोणत्याही अडचणी येत नाहीत. तसेच सामान्य लोकांना मिळतो त्याच दराने त्यांना रोजगारही मिळतो.
अपरिहार्यतेतून निर्माण झालेली ही चिन्हांची भाषा सतत विकसित होत आहे. नवनवीन अनुभवांतून त्यात सतत चिन्हांची भर पडत आहे. विशेष म्हणजे चेहऱ्यावरील हावभाव आणि हातवारे यांच्या माध्यमांतून ही भाषा बोलली जात असल्यामुळे अभिनय कलेचा अनायसे विकास या भाषकांमध्ये होतो. परिणामत: या गावातून अनेक आघाडीचे अभिनेते तयार झाले आहेत. स्थानिक रंगभूमीपासून ते चित्रपट, मालिकांपर्यंत त्यांनी लौकीक मिळविला आहे.
(Image Credit : BBC.com)
पिशाच्चांशी संवाद साधत असल्याची श्रद्धा
बालीमधील हिंदू समूदायामध्ये मृत्यूनंतरच्या जीवनाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचा दफनविधी खूपच काळजीपूर्वक आणि श्रद्धेने केला जातो. या दफनविधीत आणि त्यासाठी खड्डे खोदण्यात 'कोलोक' मंडळींना अग्रक्रम दिला जातो. कारण अन्य कोणतेही आवाज ऐकू न शकणाऱ्या या मंडळींना स्मशानातील भूत-पिशाच्चांचे आवाज ऐकू येतात आणि ते त्यांचीशी संवाद साधून मृताच्या राहिलेल्या इच्छा किंवा त्याचा पुढील जन्म याची माहिती घेऊ शकतात, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.