Traffic Sign Trending Photo: सोशल मीडियावर अनेकदा अनेक प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात. कधी काही लोक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतात, तर कधी सरकारला त्यांच्या निर्णयांचा जाब विचारतात. नुकताच ट्विटरवर एक विचित्र फोटो शेअर करून बंगळुरू पोलिसांना प्रश्न विचारण्यात आला. आता या प्रकरणावर बंगळुरू पोलिसांचे उत्तर आले आहे. वास्तविक या फोटोमध्ये रस्त्यावर एक नवीन ट्रॅफिक चिन्ह दाखवले जात आहे. त्यामुळे साऱ्यांनाच यावरचं उत्तर अपेक्षित आहे.
या फोटोमध्ये तुम्हाला त्रिकोणात चार ठिपके दिसतील. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की हे कोणते वाहतूक चिन्ह म्हणजे Traffic Signal आहे? हे चिन्ह नक्की कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या जागी लावण्यात आलंय तेही सांगितलं आहे. बंगळुरूच्या होपफार्म सिग्नलच्या आधी हा बोर्ड लावला असल्याचे व्यक्तीने सांगितले. हे ट्विट करत त्या व्यक्तीने वाहतूक पोलिसांना टॅगही केले. सर्वात आधी, पाहा ते व्हायरल होत असलेले ट्विट-
पोलिसांनी सांगितला चिन्हाचा अर्थ
ट्रॅफिक पोलिसांनी त्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, हा धोक्याचा इशारा देणारा फलक आहे. रस्त्यावर अंध व्यक्ती येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही वाहन चालवताना काळजी घ्या, असा तो इशारा आहे. पोलिसांनी पुढे सांगितले की, होप फार्म जंक्शन येथे एक शाळा (अंध लोकांसाठी) आहे जिथे हा बोर्ड लावण्यात आला आहे. हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्रॅफिक चिन्हाबाबत अनेकांच्या मनात संभ्रम होता, मात्र वाहतूक पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडत लोकांना या चिन्हाबद्दल जागरुक करून या फोटोचे कोडे सोडवले.