हल्ली सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टीचे पडसाद उमटतात. कोणतीही गोष्ट उचलून धरली जाते तर कशावरही टीका होऊ शकते. डव साबणाच्या एका जाहिरातीवरही अशीच टीका करण्यात येत आहे. आपल्या साबणाची जाहिरात करण्यासाठी डवने एक व्हिडिओ त्यांच्या युएस फेसबूक पेजवर शेअर केला होता. मात्र जगभरातून झालेल्या जोरदार ट्रोलनंतर त्यांना ही जाहिरात मागे घ्यावी लागली.
नेटिझन्सच्या म्हणण्यानुसार ही जाहिरात अत्यंत असंवेदनशील असून यामुळे समाजात वर्णभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेकांनी ही जाहिरात शेअर करून डवला चांगलेच टार्गेट केले. नेटिझन्सने उडवलेली टीकेची झोड पाहता कंपनीला जाहिरात मागे घेणे भाग पडले. शिवाय त्यांनी या जाहिरातीवरुन दिलगिरीही व्यक्त केली. याबाबत डवने ट्विट केलं आहे की, ‘फेसबूकवरून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरुन कोणाच्या भावना दुखावल्या असतली तर आपण क्षमस्व आहोत.’
या व्हिडिओमध्ये एक सावळी मुलगी आपलं टी-शर्ट काढते आणि लगेच तिचा रंग उजळतो. एका साबणाने सावळा रंग उजळतो ही मानसिकताच वाईट असल्याचे नेटीझन्सचे म्हणणे आहे. अश्या जाहीरातींमुळे एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जो वर्णभेद समाजात होता तो पुन्हा येऊ लागेल. त्यामुळे अशा जाहिरातींवर आणि अशी मानसिकता निर्माण करणाऱ्या उत्पादनांवर बंदी घातली पाहिजे असंही काही नेटिझन्सचं म्हणणं आहे.
जगभरातील नेटिझन्सने ही जाहिरात बंद व्हावी म्हणून वेगवेगळ्या भाषेत अनेक हॅशटॅग ट्रेन्ड केलेत. त्या हॅशटॅगवर अनेकांनी पोस्ट शेअर करत या जाहिरातीवर निषेध व्यक्त केला. शिवाय अनेक प्रसार माध्यमांनीही ही जाहिरात बरीच उचलून धरली. ब्रिटेनमधल्या एका चॅनेलवर या विषयाविरोधात एक डिबेट शोही आयोजित करण्यात आला होता. सर्व स्तरातून या जाहिरातीवर होणारी टीका पाहता डवला ही जाहिरात मागे घ्यावी लागली आहे आणि माफी मागावी लागली आहे.