निवडणूक जवळ आली की, नेते लोकांकडे मत मागण्यासाठी जातात, त्यांची मते मिळवण्यासाठी मतदारांना वेगवेगळी प्रलोभने दिली जातात. कुणी सांगतं बेघरांना घरे दिली जातील, कुणी सांगतं नोकरी दिली जाईल...पण निवडणूक झाली की, जैसे थे परिस्थिती होते. पण तुर्कीमध्ये एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. इथे मतदारांची मते मिळवण्यासाठी एका नेत्याने भाजीला हत्यार केलं आहे.
३१ मार्च रोजी तुर्कीमध्ये स्थानिक निवडणूका होणार आहेत. पण यावेळची तयारी आधीच्या निवडणुकीपेक्षा फार वेगळी आहे. इथे सध्या रेसेप तय्यिप एर्दोगान हे अध्यक्ष आहेत. त्यांनी यावेळी निवडणुकीमध्ये काळे मिरे, पालक आणि टोमॅटोला हत्यार बनवलं आहे.
तुर्कीमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तू चांगल्याच महाग झाल्या आहेत. हे बघता सरकारने इथे सहा शहरांमध्ये तात्पुरती दुकाने सुरू केली आहेत. यात दुकानांमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तू मिळतील आणि त्या सुद्धा स्वस्त.
एर्दोगान म्हणाले की, या दुकानांमधून स्वस्त दरात खाण्या-पिण्याच्या वस्तू मिळतील. भविष्यात ते याप्रकारची दुकाने सुरू करतील. सध्या या दुकानांमध्ये लोकांची चांगलीच गर्दी होत आहे. लोकांना लाइनमध्ये उभं राहून सामानाची खरेदी करावी लागत आहे.
सध्या तुर्कीमध्ये महागाईने डोकं वर काढलं आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत इथे स्थानिक करन्सीची किंमत कमी झाली. तर खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या किंमतीत ३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या १५ वर्षातली ही सर्वात जास्त वाढलेली महागाई आहे.
तर तज्ज्ञांचं असं मत आहे की, तुर्कीच्या स्थितीला हवामानही कारणीभूत आहे. पूर यामागील सर्वात मोठं कारण आहे. दक्षिण तुर्कीमध्ये अजूनही पूराने थैमान घातलं आहे. या आर्थिक कारणांचा निवडणुकांवर प्रभाव तर पडणारचं. त्यामुळे तेथील अध्यक्षांनी पालक, टोमॅटो आणि खाण्या-पिण्याच्या वस्तू स्वस्तात देऊ लोकांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला आहे.