Twins Marriage : पश्चिम बंगालच्या बर्दवानमध्ये जुळ्या भावांनी आणि जुळ्या बहिणींसोबत लग्न केलं. लव-अर्पिता आणि कुश-परमिता यांचं लग्न मंगळवारी बर्दवानच्या कुरमुन गावात झालं. काही वेळाच्या अंतराने अर्पिता मोठी आणि परमिता लहान आहे. पण बालपणापासून सोबत दोघींचं शिक्षण, फिरणं, मोठं होणं सगळं काही सोबत झालं. दोघींनी बर्दवानच्या मुलींच्या शाळेत शिक्षण घेतलं आणि एका कॉलेजमधून पदवीही घेतली.
अर्पिता आणि परमिता सांगतात की, दोघीही बालपणापासून सोबत वाढल्या. त्यामुळे आम्हा दोघींचीही इच्छा होती की, लग्न एकाच घरात व्हावं. त्यांनी त्यांची ही ईच्छा आई-वडिलांकडे सांगितली. त्यानुसार त्यांनी मुलींसाठी जुळ्या मुलांचा शोध सुरू केला. अर्पिता आणि परमिता गौरचंद्र संतरा एका स्थानिक फॅक्टरीमध्ये काम करतात.
दोघींचे वडील गौरचंद्र संतरा यांनी सांगितलं की, जेव्हा मुलींनी त्यांना त्यांची ईच्छा सांगितली तर त्यांनी तसेच मुलं शोधणं सुरू केलं. योगायोगाने कुरमुन गावात लव पाकरे आणि कुश पाकरे मिळाले. दोघांचे कुटुंबियही मुलांच्या लग्नासाठी मुली शोधत होते. आम्ही बोलणी केली आणि लग्न जुळवली. 5 डिसेंबरला लग्न झालं आणि तेही एकाच मांडवात.
लव आणि कुश एकाच कंपनीत काम करतात. दोघांच्या कुटुंबियांनी सांगितलं की, अर्पिता आणि परमिता यांच्याकडून जेव्हा मागणी झाली तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनाही अशाच मुलींचा शोध होता. लव आणि कुशने निळ्या रंगाचा पायजामा-कुर्ता घातला होता. तर अर्पिता आणि परमिता यांनी लाल रंगाची साडी. सध्या हे लग्न चर्चेचा विषय ठरत आहे. दोघांनाही लग्नाच्या खूप शुभेच्छा!