न्यूयॉर्क - जुनं ते सोनं अशी म्हण प्रचलित आहे. मात्र सर्वच जुन्या वस्तूंना फार किंमत मिळते असं नाही. मात्र अमेरिकेत एका ओसाड खाणीमध्ये १०० वर्षांपूर्वी सापडलेल्या दोन फाटक्या जिन्सना सोन्यापेक्षाही अधिक भाव मिळाला आहे. लिवाइस (Levi’s) जिन्सची ही जोडी तब्बल ६२ लाख रुपयांना विकली गेली. या जिन्स अमेरिकेतील एका निर्मनुष्य खाणीमध्ये १८८० च्या दशकामध्ये सापडल्या होत्या. या जिन्स खाणीतून बाहेर काढून १०० हून अधिक वर्षे झाली असली तरी त्या अद्यापही परिधान करण्यायोग्य आहेत.
वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार या जिन्सची विक्री अमेरिकेच्या न्यू मेक्सिकोमध्ये झाली. Levi Strauss & Co ब्रँडच्या या जिन्स गोल्ड रशच्या काळातील आहेत. जिन्सच्या लिलावादरम्यान याची माहिती देण्यात आली. या जिन्स १८८० च्या दशकातील असावी असा अंदाज आहे. त्यामुळे त्यांना सध्या १४० हून अधिक वर्षे झाली असावीत.
या जिन्सची खरेदी केल हॉपर्ट यांनी जिप स्टिव्हन्स यांच्यासोबत मिळून खरेदी केली. एका खरेदीदाराचे प्रीमियम जोडल्यानंतर दोघांनीही या जिन्ससाठी एकूण ७१ लाख रुपये मोजले. केल हॉपर्ट विंटेज क्लोथिंग डीलर आहेत. एक जोडी जिन्स खरेदी केल्यानंतर याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. तसेच अनेकजण या जिन्सना एवढी किंमत मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करत आहेत.