प्रेमाच्या खास क्षणांमध्ये प्रेमींना कोणत्याही गोष्टीचं भान राहत नसतं. असेही कुणीतरी म्हटले आहे की, प्रियकरासोबत प्रेमाचे काही क्षण घालवणे हे समुद्रात उडी घेतल्यासारखं असतं. ऑस्ट्रेलियात दोन पक्षी असेच प्रेम करण्यात हरवून गेले होते. दोघेही एकमेकांमध्ये हरवले होते. लोकांच्या मधे असूनही ते दोघे सर्वांपासून दूर होते. पण झालं असं की, हे दोन पक्षी प्रेमात असे काही बुडाले होते की, त्यांच्यामुळे तब्बल १ हजार घरातील वीज खंडीत झाली होती.
ऑस्ट्रेलियातील पर्थची ही घटना आहे. Kookaburra प्रजातीचे दोन पक्षी एकमेकांवर प्रेम करण्यात मग्न होते. पण आता त्यांना काय माहीत की, त्यांचं अशाप्रकारे बेधुंद होऊन प्रेम करणं १ हजार घरात राहणाऱ्या लोकांसाठी डोकेदुखीचं ठरेल. झालं असं की, दोन्ही पक्ष्यांमध्ये विजेच्या खांबाजवळ रासलीला सुरू होती. प्रेमाच्या धुंदीत असलेले दोघेही काही वेळाने विजेच्या तारांना भिडले, लख्ख प्रकाश झाला आणि मोठा आवाज झाला. त्यानंतर एका झटक्यात परिसरातील वीज गायब झाली.
फेअरफॅक्सच्या रिपोर्टनुसार, विजेच्या खांबाजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, ही घटना दुपारी ४ वाजताची आहे. ही व्यक्ती त्यावेळी त्याच्या कुत्र्यांना फिरायला घेऊन गेली होती. त्यानेच सांगितले की, दोन पक्षी प्रेमात आकंठ बुडाले होते. अचानक ते विजेच्या तारांना भिडले. त्या पक्ष्यांचा तारांना स्पर्श होताच, निळ्या रंगाचा लख्ख प्रकाश झाला आणि जोरदार धमाका झाला.
धमाका झाला आणि परिसरातील वीज गेली. साधारण दीड तास शहरी भागातील वीज खंडीत झाली होती. वेस्ट पॉवरचे प्रवक्ता म्हणाले की, 'असं दिसतंय की, वीज त्या दोन पक्ष्यांमुळेच गेली होती. तिथे इलेक्ट्रिक सब स्टेशनच्या जवळच या पक्ष्यांचं घरटं आहे. आम्ही प्रयत्न करतोय की, भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये'.
यात दु:खद बाब ही की, दोन्ही पक्षी शॉक लागल्याने मरण पावले. प्रेम करत दोघे सोबत जगले आणि प्रेम करत करत मरण पावले.