चोरांचं डोकं कसं चालतं हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण वेगवेगळ्या सिनेमातून आणि आजूबाजूला होणाऱ्या चोऱ्यांमधून आपण ते बघत असतो. आजकाल सीसीटीव्हीमुळे चोरांनी चोरी करण्याच्या आणखी वेगळ्या आयडिया शोधून काढल्या आहेत. चोर आता वेगवेगळे मास्क घालून आपलं काम करतात. आता हेच बघा ना तामिळनाडूतील तिरूचिरापल्लीमध्ये एका ज्वेलरीच्या दुकानात चोरी झाली. १३ कोटींचे दागिने घेऊन चोर पसार झाले. सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर त्या दोन चोर दिसले सुद्धा. पण दोघांनीही कुत्र्या-मांजरांचा मास्क घातला होता.
चोरांनी ललिता ज्वेलरी दुकानातील साधारण १०० किलो सोनं लांबवलं आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता एका कर्मचाऱ्याने दुकान उघडलं तर हैराण झाला. त्याने पाहिलं की, पूर्ण दुकान रिकामं झालं आहे. त्याने लगेच पोलिसांना ही माहिती दिली आणि पोलीस पोहोचले.
पोलिसांनुसार, दुकानाच्या मागील एक भिंतीला छिद्र करून हे चोर आत घुसले होते. ज्या परिसरात हे दुकान आहे, तो परिसर शहरातील सर्वात लोकप्रिय परिसर आहे. इथे २४ तास लोकांची वर्दळ असते. अशात इतकी मोठी चोरी होणं मोठी धक्कादायक बाब मानली जात आहे.
एकतर चोर कुत्र्या-मांजराचे मास्क घालून आले होते. दुसरं त्यांनी हातमोजे घातले होते. ज्यामुळे कुठेही त्यांचे फिंगर प्रिंट्स नाहीत. सध्या पोलीस चौकशी करत आहेत. पुन्हा पुन्हा सीसीटीव्ही फुटेज चेक केलं जात आहे.