उदयपूरमधील एका वडिलांनी आपल्या दोन मुलींसाठी एक खास गोष्ट केली आहे. भारताने चंद्रावर चंद्रयान 3 यशस्वीपणे उतरवून नवा इतिहास रचला. त्यामुळे अनेकांना आता चंद्रावर जाण्याची स्वप्नं पडू लागली आहेत. जेव्हा मुलींनी चंद्रावर राहण्याची इच्छा त्यांच्या वडिलांकडे व्यक्त केली तेव्हा एका वडिलांनी देखील आपल्या मुलींसाठी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.
उदयपूर येथील रहिवासी असलेले मिठालाल मेघवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते व्यवसायाने कंत्राटदार आहेत. त्यांना मानसी आणि मिताली या दोन मुली आहेत. एक मुलगाही आहे. चंद्रयान 3 चे प्रक्षेपण पाहिल्यानंतर मुलींनी विचारलं होतं की आपणही चंद्रावर जाऊन तेथे राहू शकू का, तेव्हा त्यांनी मुलींचं स्वप्न पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. त्यांनी चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी वेबसाइटवर नोंदणी केली आणि दोन्ही मुलींसाठी 63 डॉलर देऊन 1 एकर जमीन खरेदी केली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुलींना याबाबत सांगितलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला.
चंद्रावर जमीन खरेदी करायची असेल तर ऑनलाईन जमीन खरेदी करू शकता. येथे चंद्राचे अनेक भाग बे ऑफ रेनबो, लेक ऑफ ड्रीम, सी ऑफ वॅपोर्स, सी ऑफ क्लाउड्स अशा नावांनी दिसतील. यापैकी कोणत्याही ठिकाणी तुम्ही जमीन खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतील. 500 एकरपेक्षा जास्त जमीन खरेदी करायची असेल तर EMI ची सुविधाही मिळेल.
जमीन खरेदी केल्यानंतर, तुम्ही त्यावर कोणताही दावा करू शकणार नाही. खरं तर, 1967 मध्ये, 104 देशांनी एका करारावर स्वाक्षरी केली होती, ज्यानुसार चंद्र, तारे आणि इतर अंतराळ वस्तू कोणत्याही एका देशाची मालमत्ता नाहीत. यावर कोणीही दावा करू शकत नाही. भारतानेही या करारावर स्वाक्षरी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.