दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा मर्डर केसने सगळ्यांचा हादरवून सोडलं आहे. या केसमधील आरोपी आफताबचे कृत्य जसजसे समोर येत आहेत, लोक ऐकून हैराण होत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, आफताब दररोज रात्री फ्रिजमध्ये ठेवलेलं श्रद्धाचं कापलेलं शीर बघत होता. लोक तर हैराण झाले आहेत की, एक तरूण इतका क्रूर असू शकतो. पण क्रूरतेचा हा एकच किस्सा नाहीये. असे अनेक लोक असतात ज्यांचं वागणं आणि आवडी राक्षसासारख्या असतात. असाच एक व्यक्ती म्हणजे युगांडाचा हुकूमशहा ईदी अमीन. ईदीला मानवांचे शीर कापून ठेवणे आणि मानवी मांस खाण्याची आवड होती.
युगांडाचे मंत्री हेनरी क्येम्बा यांच्या त्यांच्या ‘द स्टेट ऑफ ब्लड: द इनसाइड स्टोरी ऑफ ईदी अमीन’ (State of Blood: The Inside Story of Idi Amin) पुस्तकात ईदी अमीनचे अनेक किस्से लिहिले आहेत. त्यांनी लिहिलं की, कशाप्रकारे ईदी अमीनला मानवी मांस खाणं पसंत होतं. अमीनच्या कार्यकाळा दरम्यान युगांडामध्ये भारतीय राजदूत राहिलेले मदनजीत सिंह यांनीही त्यांच्या पुस्तकात उल्लेख केला की, ईदी अमीन कापलेले मानवी शीर फ्रिजमध्ये ठेवत होता.
ईदी अमीनने 1971 मध्ये मिल्टन ओबोटेला हटवून सत्ता स्थापन केली होती. 4 ऑगस्ट 1972 ला ईदी अमीनने अचानक आदेश दिला की, सगळ्या आशियाई लोकांनी लगेच युगांडा सोडावं. त्याचं म्हणणं होतं की, त्याला अल्लाहने स्वप्नात सांगितलं की, त्याने युगांडातून सगळ्या आशियाई लोकांना बाहेर काढावं.
हेनरी क्येम्बा यांनी पुस्तकात लिहिलं की, ईदी आधी त्याच्या दुश्मनांना मारत असे आणि नंतर त्यांच्या मृतदेहासोबत गैरकृत्य करत होता. ईदी मारलेल्या लोकांजवळ काही वेळ एकटाच थांबत असे. ईदी अमीन हा काकवा जमातीचा होता. असं मानलं जातं की, या जमातीचे लोक त्यांच्या दुश्मनांचं रक्त पित होते. त्यांनी लिहिलं की, ईदी अमीन मानवी मांस खात असे. त्यांनी हेही सांगितलं की, ईदी अमीनचा एक नोकर मोजेज अलोगा कीवियाला पळून गेला होता. त्यानेही ईदीबाबत अनेक खुलासे केले होते.
मदनजीत सिंह यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं की, ईदी अमीन त्याच्या घरातील एक खोली नेहमीच बंद ठेवत होता. अमीनची पाचवी पत्नी सारा क्योलाबा एकदा जबरदस्ती त्या खोलीत शिरली होती. तिथे जे दिसलं ते पाहून ती हैराण झाली होती. ईदी अमीनने त्या खोलीत दोन फ्रीज ठेवले होते. ते अमीनच्या पत्नीने उघडून पाहिले. तिला फ्रीजमध्ये काही मानवी शीर कापून ठेवलेले दिसले.