भारीच! 'हे' आहे अनोखं गाव जिथे प्रत्येक घरात पाळले जातात 'मोर', अशी घेतली जाते काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 11:26 AM2021-10-07T11:26:26+5:302021-10-07T11:32:05+5:30
Peacock Village : गावच्या घरोघरी मोर पाळलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच मोरांचं गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली असून हे गाव अत्यंत लोकप्रिय झालं आहे
नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एक असं अनोखं गाव आहे जिथे प्रत्येक घरात मोर पाळले जातात. हे सुंदर दृश्य पाहून सर्वच जण आनंदी होतात. उज्जैनपासून जवळपास सात किलोमीटर दूर अंतरावर चिंतामन रोडजवळ एक मंगरोला गाव आहे. हा एक ग्रामीण परिसर आहे पण या गावाची खासियत म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात आपला राष्ट्रीय पक्षी मोर वास्तव्यास आहे. या गावच्या घरोघरी मोर पाळलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच मोरांचं गाव अशी या गावाची ओळख निर्माण झाली असून हे गाव अत्यंत लोकप्रिय झालं आहे. सर्वत्र या गावाची चर्चा रंगली आहे.
मंगरोला या गावातील नागरिकांनी मोरांना वाचवण्यासाठी या मोहीम सुरू केली असून राज्यातील पहिले मोर संवर्धन केंद्र त्यांनी उघडलं आहे. जखमी मोरांना रुग्णालयात नेण्याचं कामही गावकरी करत आहेत. या मंगरोला गावाची लोकसंख्या साधारण एक हजार असून त्यांच्याकडे 600 मोर आहेत. मोरांचे निवारा बनलेलं हे गाव आता मोरांमुळे ओळखलं जाऊ लागलं आहे. मोरांना वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी सुरुवातीला पैसे जमा केले आणि त्यानंतर मोर संवर्धन केंद्र बांधले. संवर्धन केंद्रामध्ये मोरांच्या राहण्याची आणि उपचाराची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
तरुण गावकऱ्यांनी मोरांच्या देखरेखीची स्वीकारली जबाबदारी
उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी देखील मोरांच्या संरक्षणासाठी आमदार निधीतून 5 लाख रुपये दिले आहेत. आता गावातच सरकारी जमिनीवर मोर संवर्धन केंद्र सुरू करण्यात आलं आहे. मोर आता या गावाचाच एक महत्त्वाचा भाग बनत चालले आहेत. जसे घरातील पाळीव प्राणी कुत्री आणि मांजर असतात. तसेच या गावात मोर घरोघरी फिरताना दिसतात. मंगरोला गावाच्या आजुबाजूला असलेल्या 15 गावांमध्ये आता मोरांची संख्या वाढत आहे. तरुण गावकऱ्यांनी मोरांच्या देखरेखीची जबाबदारी स्वीकारली आहे.
मोर संवर्धन केंद्रासाठी 10 एकर जमीन
कधीकधी मोर शेतातील कीटक देखील. त्यामुळे ते अनेक वेळा आजारी पडतात. अनेक वेळा जंगली प्राणी मोरांवर हल्ला करून जखमी करतात. आता यासाठी जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेतला असून मोर संवर्धन केंद्रासाठी 10 एकर जमीन दिली आहे. हे राज्यातील पहिले आणि एकमेव मोर संवर्धन केंद्र आहे. मोर उन्हाळ्यात घरी राहतात आणि थंड आणि पावसाच्या वेळी शेतात जातात. मोर इतके मैत्रीपूर्ण झाले आहेत की ते घराच्या बाजूला बागेत अंडी घालतात. गावकरी मग रात्रंदिवस त्यांचं रक्षण करतात जेणेकरून मांजर ते खाऊ नये. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.