कुणाचं नशीब कसं आणि कधी चमकेल हे काही सांगता येत नाही. याची अनेक उदाहरणंही बघायला मिळतात. अशीच एक घटना एका कपलसोबत घडली. कपलला घराचं काम करत असताना खजिना सापडला आणि ते मालामाल झालेत. हे कपल आपल्या किचनचं काम करत होते. त्यासाठी खोदकाम केलं जात होतं. तेव्हा त्यांना खजिना सापडला. त्यांना सोनं आणि चांदीची खूपसारी नाणी सापडली. या नाण्यांची किंमत साधारण 62 लाख रूपये आहे. कपलचं नाव रॉबर्ट आणि बेकी फूक्स असं आहे.
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, या कपलचं घर इंग्लंडच्या डोकसेटमध्ये आहे. हे घर 17व्या शतकातील एक कॉटेज होम आहे. रॉबर्टने कुदळीच्या मदतीने एक खोल खड्डा केला आणि तेव्हाच त्यांना 400 वर्ष जुनी सोन्या-चांदीची नाणी सापडली. या नाण्यांची संख्या 1029 इतकी आहे. यात किंग जेम्स पहिला आणि किंग चार्ल्स पहिला यांच्या आकृती आहेत. असं मानलं जातं की, ही नाणी 1642 आणि 1644 दरम्यानची असून गृह युद्धादरम्यान लपवून ठेवण्यात आली होती. ही ज्यांनी लपवली ते कधी परत आलेच नाहीत.
रॉबर्ट आणि बेकीने स्थानिक अधिकाऱ्यांना याबाबत सांगितलं आणि मग या नाण्यांची ओळख पटवण्यासाठी ब्रिटीश संग्रहालयात पाठवले. तेव्हा एका लिलावात ही नाणी 62 लाख रूपयांना विकण्यात आली. कपलने हे कॉटेज 2019 साली खरेदी केलं होतं. पण ते तेव्हा इथे राहण्यासाठी आले नाहीत. कारण या घराचं काही काम बाकी होतं. यावर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांना किचनच्या खाली नाणी सापडली. पण त्यांची ओळख पटवण्यात वेळ लागला. ही नाणी 400 वर्ष जुनी आहेत.