(सांकेतिक फोटो)
घराची साफ सफाई करताना सगळेच कचरा बाहेर फेकतात. पण कधी कधी चुकून काही महत्वाच्या गोष्टीही बाहेर फेकल्या जातात. असंच काहीसं इंग्लंडमध्ये झालं. येथील एका कपलने घराची स्वच्छता केल्यावर कचऱ्यासोबत एक बॉक्सही बाहेर फेकला. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, त्या बॉक्समध्ये नगदी १४ लाख रूपये ठेवले होते तेव्हा त्यांना धक्का बसला.
हे कपल इंग्लंडच्या सोमरसेटमध्ये राहतं. त्यांनी त्यांच्या नावाचा खुलासा केला नाही. पण पोलिसांनी या घटनेची माहिती फेसबुकवर शेअर केली. रिपोर्ट्सनुसार, हे कपल एका मृत नातेवाईकाच्या घराची स्वच्छता करत होतं. दरम्यान काही जुने बॉक्स घेऊन ते रिसायक्लिंग सेंटरला गेले. बॉक्स तिथे ठेवून कपल घरी परतलं.
रिसायक्लिंग सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी प्रकिया करण्याआधी बॉक्सची तपासणी केली. त्यांना एका बॉक्समध्ये १५ हजार पाउंड नगदी होते. कर्मचाऱ्याने इमानदारीने पोलिसांना संपर्क केला. नंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फु़टेजवरून कपलच्या कारचा नंबर मिळवला. आणि कपलला भेटण्यासाठी गेले.
पोलिसांना कपलने सांगितले की, ज्या नातेवाईकाचं निधन झालं होतं त्यांना पैसे लपवून ठेवण्याची सवय होती. ते असेच पैसे जमा करत होते. पोलिसांनी आणखी काही विचारपूस केली आणि तो बॉक्स कपलकडे सोपवला. आता ख्रिसमसच्या निमित्ताने कपलला मिळालेला हा बॉक्स कोणत्याही गिफ्टपेक्षा कमी नाहीच.