मिशिगन - घराचं भाडं न देऊ शकलेल्या एका मुलीला दोघांनी बळजबरीने शरीरविक्रीच्या व्यवसायात ढकल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील मिशिगन शहरात उघडकीस आला. घर मालकाने एका लहानशा खोलीत तिला डांबून ठेवलं होतं. त्यांच्या शेजाऱ्यांना काही गडबड असल्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि सगळा प्रकार समोर आला. नंतर पोलिसांनीही तत्काळ कारवाई करून त्या मुलीची सुटका केली .
मिशेल वेल्च आणि मिस्ती गॉर्ग अशी त्या दोन आरोपींची नाव असून त्यांचा शरीरविक्री करणाऱ्या महिला पुरवण्याचा ऑनलाईन व्यवसाय आहे. पीडित तरुणी मानसिक आणि शारीरिक व्याधींनी त्रासलेली असल्याने आरोपी दोघांनी त्या गोष्टीचा गैरफायदा घेतला.
त्यांनी पीडितेला एका खोलीत डांबून ठेवलं होतं. त्या खोलीमध्ये नैसर्गिक विधींच्या सोयीसुध्दा उपलब्ध नव्हत्या. ऑनलाईन माध्यमातून आलेल्या ग्राहकांना ही २९ वर्षीय तरुणी काही तासांसाठी विकली जात असे. बरेच दिवस खोलीत डांबून ठेवलं असल्याने तिला कुठेच तक्रार करता आली नाही. मात्र एका सजग शेजाऱ्यामुळे हा प्रकार उघड झाला. ती अशी किती दिवसांपासून बंदिस्त होती याचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्यासंबंधी आरोपींना मानवी तस्करी आणि शरीरविक्रीतून पैसा कमवण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बरेच दिवस जवळच्या शेजाऱ्यांनाही या प्रकाराची कल्पना नव्हती. मात्र दुसऱ्या सजग शेजाऱ्यांमुळे हा क्रूर प्रकार लोकांसमोर आला. पोलिसांनीही या घटनेचा मोठा धक्का बसला. दोन्ही आरोपींना २४ ऑक्टोबरला पुढील कारवाईसाठी न्यायालयात नेण्यात येणार आहे.